www.24taas.com , झी मीडिया, वॉशिंग्टन
भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पुढील महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. ते व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध वाढविण्याबाबत ते चर्चा करतील. २७ सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये ही भेट होणार आहे.
मनमोहन सिंग सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक बैठकीसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावेळी ते ओबामांशी व्यापार, गुंतवणूक आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचे अमेरिकेच्या सरकारी अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पाकिस्तान सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा अमेरिका दौरा होत आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांच्या बैठकीनंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राईस आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांची भेट होणार आहे.
ओबामा आणि मनमोहन सिंग यांच्यात चर्चा होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. पण, तारीख निश्चित करण्यात आली नव्हती. याच दरम्यान, अमेरिकेत मनमोहनसिंग यांची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशीही चर्चा होण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान यांच्यामध्ये अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हाने, व्यापार आणि अफगणिस्तान व न्यूक्लियर देवाणघेवाण या विषयांवर चर्चा होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.