टोक्यो : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात सोमवारी चर्चा पार पडली. यावेळी, उभयदेश सुरक्षा, गुंतवणूक आणि असैन्य अणु करारासंबंधी चर्चेत गती यावी, यावर दोन्ही पक्षांचं एकमत झालं.
व्यक्तीगत स्तरावर संबंध चांगले ठेवणाऱ्या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये लाभदायक आणि अर्थपूर्ण विचारांचं आदान-प्रदान झाल्याचं सांगण्यात येतंय.
यावेळी, आबे यांनी जपानकडून भारतातील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात आपली गुंतवणूक दुप्पट करण्याची घोषणा केलीय. येत्या पाच वर्षांत जपान भारतात 35 अरब डॉलर (2लाख 10 हजार करोड़ रुपये) गुंतवणूक करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोबतच दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक अॅन्ड ग्लोबल पार्टनरशीप’चा दर्जा देण्यावरही एकमत नोंदवलंय.
उभयदेशांतील चांगले संबंध लक्षात घेता जपान पंतप्रधान आबे स्वत: नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी शनिवारी क्योतो इथं उपस्थित झाले होते. त्यानंतर हे दोघेही प्राचीन बौद्ध मंदिरातही गेले होते.
नरेंद्र मोदी यांनी जपानच्या व्यापार जगातातील दिग्गजांशी चर्चा साधताना चीनवर सडेतोड टीका केली. काही देशांकडून इतर देशांच्या भूमिवर होणारं अतिक्रमण आणि दुसऱ्यांच्या समुद्री क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करणं, यावर मोदींनी निर्भत्सना केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.