वॉशिंग्टन : ‘आयएसआयएस’च्या दहशतवाद्यांनी मंगळवारी एक व्हिडिओ जाहीर केलाय. यामध्ये वर्ष 2012 पासून बेपत्ता असलेल्या एका अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं छाटतानाचं क्रूर दृश्यं चित्रीत करण्यात आलंय. यासोबतच, अमेरिकेनं, इराकवर हवाई हल्ले बंद केले नाहीत तर आपल्या ताब्यात असलेल्या आणखी एका अमेरिकन पत्रकाराचीही तीच दशा करण्याची धमकीही या व्हिडिओमध्ये देण्यात आलीय.
जेम्स फोले हा अमेरिकन फ्रिलान्स पत्रकार 22 नोव्हेंबर 2012 रोजी शेवटी सीरियामध्ये दिसला होता. त्यानंतर त्याला राष्ट्रपती बशर अल असदच्या सेनेनं कैद केल्याचं म्हटलं जात होतं. चार मिनिटांच्या हा व्हिडिओ यू ट्यूब आणि अल फुर्कानं मीडियात पोस्ट केला गेलाय.
या व्हिडिओची सत्यता पडताळण्यात आता अमेरिकेची अधिकारी जुंपलेत. सोबतच या व्हिडिओत ज्या व्यक्तीचा मुंडकं छाटलं गेलंय त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचाही प्रयत्न केला जातोय.
‘ए मॅसेज टू अमेरिका’ नावाच्या या व्हिडिओला ‘एसआयी’ नावाची एक वेबसाईट होस्ट करतेय. या व्हिडिओत फोले नारंगी रंगाच्या जंपसूटमध्ये दिसतोय. या पद्धतीचा सूट अमेरिकन तुरुंगातील कैदी परिधान करतात... आणि फोलेच्या पाठिमागे त्याचं मुंडकं छाटणारा दहशतवादी उभा राहून अमेरिकेसाठी संदेश देताना दिसतोय. त्याच्या हातात धारदार सुराही आहे.
काय म्हटलंय या व्हिडिओत...
मरण्याअगोदर फोले यानंही संदेश दिलाय. ‘माझे मित्र, माझं कुटुंब आणि माझे चाहते खऱ्याखुऱ्या खुन्यांविरुद्ध म्हणजे अमेरिकन सरकारविरुद्ध उभे राहावेत, अशी माझी इच्छा आहे. कारण, आज माझ्यासोबत जे काही होतंय ते त्यांच्यात गुन्ह्यांचा परिणाम आहे’ असं यावेळी फोले म्हणताना दिसतोय.
यानंतर, आयएसआयएसचा दहशतवादी संदेश देताना दिसतो. ‘आज तुमची मिलिटरी एअरफोर्स आमच्यावर इराकमध्ये दररोज हल्ले करतेय. तुमच्या या हल्ल्यांमुळे मुस्लिमांची जिविताचं आणि संपत्तीचं नुकसान होतंय... ओबामा जर तू मुस्लिमाना शांतीनं जगण्याचा अधिकार दिला नाही तर आम्ही तुमच्या लोकांना मारण्यास सुरुवात करू’ असं तो म्हणतो.
यानंतर हा व्हिडिओ थोडा वेळ थांबतो... आणि त्यावरची ट्रान्सस्क्रिप्ट सांगते, की यानंतर दहशतवाद्यानं फोलेचं मुंडकं छाटलंय.
त्यानंतर आणखीन एक अमेरिकन पत्रकार स्टीवन जोल सोटलॉफ याला कॅमेऱ्यासमोर ठेऊन दहशतवादी म्हणतो, ‘या अमेरिकन नागरिकाचं जीवन ओबामा तुझ्या पुढच्या निर्णयावर अवलंबून असेल’... सोटलॉफ याला शेवटचं 4 ऑगस्ट 2013 रोजी पाहिलं गेलंय... त्यानंतर तो बेपत्ता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.