तेहरान : इरानच्या मानवाधिकार संघटनेच्या विरोधानंतरही एका २६ वर्षांच्या तरुणीला शनिवारी फासावर चढवण्यात आलंय... आपल्यावर बलात्कार करणाऱ्या ईरानच्या एका अधिकाऱ्याला ठार केल्याचा आरोप या महिलेवर होता.
रेहाना जब्बारी हिला ईरानच्या एका सरकारी अधिकाऱ्याला - मुर्तजा अब्दोआली सरबंदीला - चाकू मारून ठार केल्याच्या आरोपाखाली फासावर चढवण्यात आलंय. या अधिकाऱ्यानं रेहानावर बलात्काराचा प्रयत्न केला होता आणि आत्मरक्षा करताना तिनं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय.
रेहानाची आई शोले पाकरावान यांनी शनिवारी या वृत्ताला दुजोरा दिलाय. तेहरान जेलमध्ये रेहानाला फासावर चढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. रेहानाला मुर्तजाच्या हत्येच्या आरोपाखाली २००७ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ती तुरुंगातच होती.
मानवाधिकार संघटना एमनेस्टी इंटरनॅशनलनं दिलेल्या माहितीनुसार, चौकशीनंतर रेहानाला दोषी ठरवण्यात आलं होतं. परंतु, रेहानाची फाशी टाळण्यासाठी मानवाधिकार संघटनेनं गेल्या महिन्यात सोशल वेबसाईट ट्विटर आणि फेसबुकवर कॅम्पेन सुरु केलं होतं. यामुळे, रेहानाची फाशी काही दिवस पुढे ढकलली होती.
सरकारी न्यूज एजन्सी तस्नीमनं दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या कुटुंबीयांनी रेहानाला माफ करण्यास नकार दिल्यानं तिची शिक्षा कायम ठेवली गेली. आत्मरक्षेसाठी आपण हत्या केल्याचं रेहाना कोर्टात सिद्ध करू शकली नाही, असंही सांगितलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.