पाय गमावल्यानंतरही तिने जिद्दीने ‘एव्हरेस्ट’ सर केले

साखळीचोराला विरोध केल्यामुळे चालत्या ट्रेनमधून फेकून देण्यात आलेल्या २५ वर्षीय अरुणिमा सिन्हाने उजवा पाय गमावूनही जिद्दीने सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट सर केले आणि स्वत:सह भारताचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी कोरले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 22, 2013, 05:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तर प्रदेशच्या २५ वर्षीय अरुणिमाचा भीमपराक्रम
साखळीचोराला विरोध केल्यामुळे चालत्या ट्रेनमधून फेकून देण्यात आलेल्या २५ वर्षीय अरुणिमा सिन्हाने उजवा पाय गमावूनही जिद्दीने सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट सर केले आणि स्वत:सह भारताचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी कोरले. असा भीमपराक्रम करणारी ती पहिली ‘विकलांग’ महिला गिर्यारोहक ठरली आहे.
केवळ एका पायाच्या बळावर जिद्दीने हिमालय चढत अरुणिमाने आज सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेट शिखर सर केले.
तिने हा पराक्रम टाटा उद्योग समूहाच्या एका एव्हरेस्ट गिर्यारोहण पथकासोबत नोंदवला. गेल्या वर्षीच तिने भारताची पहिली ‘एव्हरेस्टपटू’ बच्छेंद्री पाल हिच्या मार्गदर्शनाखालील टाटा स्टील ऍडव्हेंचर फाऊंडेशन (टीएसएएफ) गिर्यारोहण शिबिरात प्रवेश घेतला होता.

माझ्याकडे दयाभावनेने पाहू नका
‘गुंडांशी झालेल्या झटापटीत पाय गमावल्यानंतरही माझ्याकडे कुणीही दयाभावनेने पाहून चुकचुकू नये ही माझी भावना होती. असहाय्यतेचा आधार घेण्यापेक्षा जगाला, देशाला आणि माझ्या कुटुंबाला अभिमान वाटेल असा पराक्रम करण्याचा निर्धार मी केला होता. माऊंट एव्हरेस्टवर चढाईच्या कहाण्या वाचताना मला गिर्यारोहणाची प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतून एक पाय गमावल्याचे दु:ख विसरून मी एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला आणि माझा मोठा भाऊ व प्रशिक्षकांच्या पाठिंब्याने तो पूर्ण केलाय.’

*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.

*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.