अमेरिकेचा ड्रोन हल्ला; पाकिस्तान तालिबानचा म्होरक्या ठार

पाकिस्तानात शुक्रवारी केल्या गेलेल्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानी तालिबानचा म्होरक्या हकीमुल्ला महसूद याच्यासहीत आणखी सहा दहशतवादी मारले गेलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 2, 2013, 05:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पेशावर, इस्लामाबाद
पाकिस्तानात शुक्रवारी केल्या गेलेल्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानी तालिबानचा म्होरक्या हकीमुल्ला महसूद याच्यासहीत आणखी सहा दहशतवादी मारले गेलेत.
मारल्या गेलेल्यांमध्ये महसूद, त्याचा नातेवाईक तारिक महसूद आणि चालक अब्दुल्ला महसूद यांचा समावेश आहे. ‘सीआयए’द्वारे ऑपरेट केल्या जाणाऱ्या विमानाच्या साहाय्यानं उत्तर वजरिस्तान एजन्सी दांडी दारपाखेल भागात हा हल्ला केला गेला.
तालिबानी सूत्रांनीही महसूद यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिलाय. शनिवारी दुपारी तीन वाजता मीरानशाहमध्ये त्याचा दफनविधी पार पाडला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. याअगोदर ‘डॉन’ आणि ‘जिओ न्यूज’ यांनीही सूत्रांच्या हवाल्यानं महसूदसहीत सहा लोक मारले गेल्याची बातमी दिली होती.
दरम्यान, महसूदच्या मृत्यूनंतर `खान सईद मेहसूद अलियाज साजना` याची तालिबानच्या अध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित परीसर संपूर्णत: नष्ट करण्यात आलाय. या ठिकाणी दोन मिसाईल टाकल्या गेल्या. हल्ला झाला त्यावेळी पाकिस्तानी तालिबानची महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. हल्ल्यात तालिबानचे इतर प्रमुख कमांडर अब्दुल्ला आणि महसूद याचा अंगरक्षक तारिक महमूद यांचाही मृत्यू झालाय. अधिकृतरित्या अजून महसूदच्या मृत्यूची बातमी आलेली नाही. परंतु हे खरं ठरलं तर हा तालिबानला मोठाच झटका असेल.
पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये महसूदच्या मृत्यूची बातमी यापूर्वीही अनेकदा आलेली आहे. परंतु काही वेळेनंतर मात्र त्याच्या कारवाया पुन्हा उघड झाल्या होत्या. गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांनी पंतप्रधान नवाज शरीफ तसंच इतर दुसऱ्या नेत्यांशी आजच्या हल्ल्यासंबंधी चर्चा करण्यास सांगितलंय.

खान यांनी केलेल्या दाव्यानुसार, देशात शांती प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना हानी पोहचवणं, हे या हल्ल्याचं उद्दीष्टं होतं. या ड्रोन हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या विशेष सुरक्षा दलांनी टीटीपीचा उजवा हात म्हणून ओळखला जाणाऱ्या लतीफ महसूद याला अफगानिस्तानातून ताब्यात घेतलं होतं. गेल्या दोन दिवसांतील हा दुसरा ड्रोन हल्ला होता. गेल्या गुरुवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात तीन संशयित दहशतवादी ठार झाले होते. हकीमुल्ला महसूद यांनी ऑगस्ट २००९ मध्ये बैतुल्ला महसूद याच्या मृत्यूनंतर ‘टीटीपी’ची कमान हातात घेतली होती. बैतुल्ला महसूद याचा मृत्यूदेखील ड्रोन हल्ल्यातच झाला होता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.