'त्या' विमानाचा अपघात को-पायलटनं जाणूनबुजून केला - फ्रान्सचा दावा

फ्रान्समधील आल्प्स पर्वतरांगेत कोसळलेल्या जर्मन विंग्स विमानाच्या तपासात आता नवीन वळण मिळालं आहे. विमानाच्या सह वैमानिकानं जाणूनबुजून विमान खाली आणलं आणि त्यामुळंच हा अपघात झाला असा दावा या अपघाताचा तपास करणाऱ्या फ्रेंच अधिकाऱ्यानं केला आहे. त्यामुळं हा विमान अपघात आहे की पूर्वनियोजित कट होता असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Updated: Mar 26, 2015, 08:05 PM IST
'त्या' विमानाचा अपघात को-पायलटनं जाणूनबुजून केला - फ्रान्सचा दावा title=

पॅरिस: फ्रान्समधील आल्प्स पर्वतरांगेत कोसळलेल्या जर्मन विंग्स विमानाच्या तपासात आता नवीन वळण मिळालं आहे. विमानाच्या सह वैमानिकानं जाणूनबुजून विमान खाली आणलं आणि त्यामुळंच हा अपघात झाला असा दावा या अपघाताचा तपास करणाऱ्या फ्रेंच अधिकाऱ्यानं केला आहे. त्यामुळं हा विमान अपघात आहे की पूर्वनियोजित कट होता असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दोन दिवसांपूर्वी आल्प्स पर्वतरांगेत जर्मन विंग्स या कंपनीचं एअरबस ए ३२० हे विमान कोसळलं. या अपघातात विमानातील १५० जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताचा तपास करणाऱ्या फ्रान्समधील तपास यंत्रणेचे अधिकारी ब्राइस रॉबिन म्हणाले, विमान कोसळण्याच्या काही वेळापूर्वी मुख्य वैमानिक शौचालयात गेला होता आणि यानंतर तो कॉकपिटमध्ये परतलाच नाही. 

सह वैमानिकानं कॉकपिट आतून बंद करुन घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा सर्व खुलासा विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड झालेल्या संभाषणातून झाला आहे, असंही रॉबिन यांनी स्पष्ट केलं. विमान कोसळण्याच्या काही मिनीटांपूर्वी कॉकपिटमध्ये भयाण शांतता होती. मुख्य वैमानिक बाहेर गेल्यावर सहवैमानिक काहीच बोलला नाही असं समोर आलं आहे. 

अपघातापूर्वी विमान अवघ्या ८ मिनीटांमध्ये ३२ हजार फुटांनी खाली आलं होतं. त्यामुळं या सर्व घटनेवर आधीपासूनच संशय व्यक्त होत होता. आता फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी विमान अपघात नसून घातपात असल्याचे संकेत दिले आहेत. सह वैमानिकाचं नाव आंद्रेस लुबित्झ असं असून त्याला मानसिक आजार असल्याचं कधीही जाणवलं नाही असं लुबित्झच्या मित्रमंडळीचं म्हणणं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.