पाकचा माजी ‘लष्करशहा’ अखेर अटकेत

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना अखेर अटक करण्यात आलीय. इस्लामामाद उच्च न्यायालयानं त्यांच्या तत्काळ अटकेचे आदेश दिले होते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 19, 2013, 10:34 AM IST

www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना अखेर अटक करण्यात आलीय. इस्लामामाद उच्च न्यायालयानं त्यांच्या तत्काळ अटकेचे आदेश दिले होते. त्यानंतर फरार झालेल्या मुशर्रफ यांचा जामीन अर्ज दाखल करण्यात त्यांच्या वकिलांना अपयश आल्यानंतर आज पहाटेच मुशर्रफ यांना अटक करण्यात आलीय.
अटकेनंतर त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यावेळी त्यांना दोन दिवसांच्या ट्रांन्झिट रिमांडवर पाठवण्यात आलंय. मुशर्रफ यांच्या फार्महाऊसचंच रुपांतर जेलमध्ये करण्यात आलंय. मुशर्रफ यांच्यावर दहशत निर्माण करण्याची कलमं लावण्यात आली आहेत. त्यांच्या एफआयएमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कलम - ६चा समावेश करण्यात आलाय.
पाकिस्तानातल्या ‘जीओ टीव्ही’नं ही माहिती दिलीय. इस्लामाबाद कोर्टानं पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या तात्काळ अटकेचे आदेश दिले. या आदेशानंतर मुशर्रफ यांनी आपल्या खासदी सुरक्षा रक्षकांसह कोर्टाच्या परिसरातून पलायन केलं होतं. २००७ साली पाकिस्तानात आणीबाणी लादताना ६० न्यायाधीशांना मुशर्रफ यांनी पदच्युत केलं होतं. याप्रकरणी मुशर्रफांच्या अटकेचे आदेश कोर्टानं दिले होते.

अटकेचे आदेश देताच पोलीस मुशर्रफांना ताब्यात घेणार होते. पण मुशर्रफांनी चलाखीनं त्यांच्या बॉडीगार्डसह कोर्टातून धूम ठोकली. त्यानंतर त्यांना जामीन मिळण्यासाठीदेखील अर्ज केला होता परंतू तो फेटाळण्यात आला. मुशर्रफ यांना गुरुवारी रात्री त्यांच्याच फार्म हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर पहाटेच त्यांना अटकेत घेण्यात आलंय.