दाऊदला आणखी एक धक्का

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा शोध लागत नसला तरी त्याच्या जवळच्या माणसांच्या मुसक्या मात्र आवळल्या जातायत. 

Updated: Feb 20, 2016, 09:20 AM IST
दाऊदला आणखी एक धक्का title=

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा शोध लागत नसला तरी त्याच्या जवळच्या माणसांच्या मुसक्या मात्र आवळल्या जातायत. आता त्याचा पुतण्या सोहेल कासकर याला नार्को दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची बातमी आहे.

टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रातील एका बातमीनुसार सोहेल कासकर याला नार्को दहशतवादशी संबंध ठेवणे, परदेशातील दहशतवादी संघटनांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे आणि बेकायदेशीररित्या क्षेपणास्त्र डागण्याच्या प्रणालीची विक्री करणे या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. कोलंबिया देशातील एफएआरसी या दहशतवादी गटाशी त्याचे संबंध असल्याचा संशय आहे.

सोहेल आणि त्याच्या दोन पाकिस्तानी साथीदारांना अमेरिकेच्या 'ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन'च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हा सर्व प्रकार खरंतर डिसेंबर २०१५ मध्येच घडला आहे. पण. दाऊदने त्याची 'आंतरराष्ट्रीय पत' वाचवण्यासाठी पैशाचा वापर करुन ही बातमी दाबण्याचा प्रयत्न केला होता.

सोहेल जो अली दानिश नावानेही ओळखला जातो तो दाऊदचा धाकटा भाऊ नूरा याचा मोठा मुलगा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोहेलच्या सुटकेसाठी दाऊद शक्य तेवढ्या चांगल्या वकीलाची मदत घेण्याच्या प्रयत्नात आहे. कारण, सोहल या सर्व प्रकरणात दोषी आढळल्यास त्याला कमीत कमी २५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

टॉम केनीफ हे सध्या सोहेलचे मॅनहॅटन कोर्टातील वकील आहेत. कोलंबियातील दहशतवादी गटाला जमिनीवरुन हवेत क्षेपणास्त्रांचा मारा करणाऱ्या प्रणालीचा पुरवठा केल्याचा तसेच पाकिस्तानातून अमेरिकेत हेरॉईन आणल्याचा आरोप त्याच्यावर आहे.