वॉशिंग्टन : अमेरिकेने चीनला दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेट तयार करण्याची प्रक्रिया त्वरित आणि कायमची थांबवावी असं आवाहन केलं आहे.
सिंगापूरमधील शांग्री-ला चर्चेत बोलताना अमेरिकी संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर यांनी कृत्रिम बेट निर्माण करण्याची चीनची कृती आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले. चीन जवळपास संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला दावा करतो आणि या भागातील इतर देशही चीनसारखाच दावा करतात.
अमेरिकेच्या या आवाहनावर चीनने मुरब्बी पद्धतीने प्रतिक्रिया दिली. शांग्री-ला चर्चेत सहभाग घेत असलेले चिनी प्रतिनिधी झाओ शियाओझू यांनी चीनची कृती योग्य आणि वैध असल्याचे म्हटले आहे.
बांधकामाद्वारे शांतता व स्थैर्य निर्माण करण्याच्या चीनच्या प्रयत्नांवर टीका करणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले. दक्षिण चीन समुद्रात आपण करीत असलेली कृती योग्य असून सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे चीनने यापूर्वी अनेकदा म्हटले आहे.
मात्र, या मुद्यावरून तेथे हळूहळू तणाव वाढत आहे. या भागात शांतता राहावी यासाठी अशा प्रकारची कृत्रिम बेटे निर्माण केली जाऊ नयेत.
व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया आणि तैवाननेही दक्षिण चीन समुद्राचा काही भाग ताब्यात घेतल्याचे कार्टर यांनी मान्य केले; मात्र चीनने हे काम सर्वात वेगाने व सर्वाधिक प्रमाणात केल्याचे ते म्हणाले.
चीनने अवघ्या १८ महिन्यांत तब्बल दोन हजार एकर क्षेत्र ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारची कृत्ये थांबवण्यात यायला हवीत, असे ते म्हणाले.
कार्टर यांच्या या निवेदनाच्या एक दिवस आधी अमेरिकी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चीनने कृत्रिम बेट निर्माण करून तेथे दोन तोफखाने तैनात केल्याचे म्हटले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.