दक्षिण सुदानमधील हल्ल्यात तीन भारतीय जवानांचा मृत्यू

दक्षिण सुदानमध्ये झालेल्या हल्यात संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेतील तीन भारतीय जवानांचा शुक्रवारी मृत्यू झाला. शांती सेनेच्या तळावर बंडखोरांच्या टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीय जवान मृत्यूमुखी पडले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 20, 2013, 09:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
दक्षिण सुदानमध्ये झालेल्या हल्यात संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेतील तीन भारतीय जवानांचा शुक्रवारी मृत्यू झाला. शांती सेनेच्या तळावर बंडखोरांच्या टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीय जवान मृत्यूमुखी पडले.
बंडखोरांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात आणखी काही जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या वृत्ताला संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे राजदूत अशोक मुखर्जी यांनी दुजोरा दिलाय. या हल्ल्याविषयी अधिक माहिती देण्यास, संयुक्त राष्ट्राने नकार दिला.
अकोबो येथील लष्करी तळावर पहाटे हल्ला केला होता. त्यावेळी तळावर ४३ भारतीय जवान होते. त्यांच्या सोबत संयुक्त राष्ट्रांचे सहा पोलीस होते. सुमारे दीड ते दोन हजार बंडखोरांच्या टोळीने तळावर हल्ला केला. हल्लेखोरांमध्ये सामान्य नागरिकांचाही समावेश होता.
दक्षिण सुदानमध्ये लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नुइर जमातीचे बंडखोर ओकोबो परिसरातील दिनका जमातीच्या नागरिकांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात त्या परिसरातील दिनका जमातीच्या नागरिकांनाच लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.