न्यू यॉर्क : न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन भागात काल एक भयंकर अपघात घडलाय. एका इमारतीकडे असणारी ५०० फूट उंचीपेक्षा जास्त उंची असणारी एक भलीमोठी क्रेन कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.
मॅनहॅटन हा न्यूयॉर्क शहरातील गजबजलेला भाग... काल मात्र शहरात बर्फवृष्टी होत होती. त्याचसोबत जोरदार वारेही वाहू लागले होते. म्हणूनच खबरदारीचा भाग म्हणून एका इमारतीच्या काही कामानिमित्ताने लावलेली ५०० फूट उंच क्रेन खाली आणण्याच्या प्रयत्नात कामगार होते.
परंतु, क्रेन खाली उतरवताना आलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे ही क्रेन उन्मळून पडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते ही क्रेन पडताना आजूबाजूची जमीन काही काळासाठी थरथरली. क्रेन उतरवण्याच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आल्याकारणाने रस्त्यात अनेक माणसे नव्हती. पण, तरी पार्क केलेल्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीचा मात्र यात मृत्यू झाला.
ही क्रेन कोसळल्यामुळे काही ठिकाणी गॅस गळतीही झाली. ही गॅस गळती रोखण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व क्रेन्स उतरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सौजन्य - यू ट्युब