लादेनचं कुटुंब होणार सौदीला स्थायिक

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर, पाकिस्तानातच असणा-या त्याच्या कुटुंबीयांनी सौदी अरेबियात राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत लादेन कुटुंबीय सौदीकडे रवाना होण्याची शक्यता असून, पाकिस्तान सरकारने हा निर्णय गोपनीय ठेवला आहे.

Updated: Dec 7, 2011, 07:28 AM IST

झी २४ तास वेब टीम,  इस्लामाबाद 
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर, पाकिस्तानातच असणा-या त्याच्या कुटुंबीयांनी सौदी अरेबियात राहण्याचा निर्णय घेतला आहे. लादेनच्या दोन पत्नी आणि मुलांना विशेष विमानातून दोन-तीन दिवसांमध्ये सौदी अरेबियाकडे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती पाकिस्तानातील एका संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे.

पाकिस्तानच्या अबोटाबाद शहरामध्ये मे महिन्यात अमेरिकी लष्कराने टाकलेल्या छाप्यात लादेनचा मृत्यू झाला होता. सौदी अरेबियाने १९९४मध्ये ओसामा बिन लादेनचे नागरिकत्व काढून घेतले होते. लादेन कुटुंबीयाला नागरिकत्व बहाल करण्यात यावे, अशी विनंती ओसामाचा भाऊ बक्र बिन लादेनने सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांच्याकडे केली होती. लादेन कुटुंबीयाला पाकिस्तान सरकारने अमेरिकेच्या हवाली करू नये, यासाठीही अंतर्गत दबाव वाढत होता. अल् जमा या जहालमतवादी संघटनेने हल्ल्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे पाकिस्तानकडूनही सौदी अरेबियाशी संपर्क साधण्यात येत होता. मात्र, या निर्णयामुळे चौकशीला धक्का बसण्याची शक्यता आहे.

अब्दुल्ला यांनी त्यांची विनंती मान्य केल्याचे लादेन कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. येत्या दोन-तीन दिवसांत लादेन कुटुंबीय सौदीकडे रवाना होण्याची शक्यता असून, पाकिस्तान सरकारने हा निर्णय गोपनीय ठेवला आहे. सौदी अरेबियाचे पाकिस्तानातील राजदूत अब्दुल अजीझ इब्राहिम अल् गदीर यांच्याशी पाकिस्तानकडून कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही.