परवेझ मुशर्रफ यांचा कानावर हात

माझ्या काळखंडात दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये राहत असल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मी त्याच्या वास्तव्याकडे हेतूत: दुर्लक्ष केले, हा आरोप खोटा आहे, असा दावा पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केला.

Updated: Jan 10, 2012, 09:19 AM IST

www.24taas.com , जेरुसलेम

 

माझ्या काळखंडात दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये राहत असल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मी त्याच्या वास्तव्याकडे हेतूत: दुर्लक्ष केले, हा आरोप खोटा आहे, असा दावा पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केला.

 

 

लादेन पाच वर्षे पाकिस्तानमध्ये राहत होता, असा दावा अमेरिकेने केला. याचा अर्थ, माझ्या राष्ट्राध्यक्षाच्या कारकिर्दीतील दोन वर्षे तो पाकिस्तानमध्येच होता; पण तो इथे राहत आहे, याची मला अजिबात कल्पना नव्हती. त्याच्या वास्तव्याबद्दल मला कधीच कुठलीही माहिती मिळाली नाही, मग त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्‍नच नाही.  लादेन दळणवळणाची कुठलीही आधुनिक साधने वापरत नव्हता. त्यामुळे खबऱ्यांकडून त्याची माहिती मिळणे, हा एकच मार्ग शिल्लक राहतो. तसेच लादेनच्या शेजाऱ्यांनाही त्याच्या वास्तव्याची कल्पना नव्हती, मग इतरांना कळणे अशक्‍यच होते, असे मत मुशर्रफ यांनी म्हटले आहे.

 

 

मुशर्रफ यांनी इस्रायली वृत्तसंस्थेला दिलेल्या पहिल्या मुलाखतीमध्ये ओसामाला पाकिस्तानने पाठिंबा दिला नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी प्रशासनाने जाणीवपूर्वक लादेनकडे दुर्लक्ष केल्याचा पाश्‍चिमात्य देशांचा आरोपही त्यांनी खोडून काढला. लादेन अगदी वर्दळीच्या जागी लपून राहिला होता, असे पाश्‍चिमात्य देश सांगतात. यामागे त्यांचा हेतू काय आहे, हे उघड आहे. लादेनचे घर त्या भागातील इतर घरांप्रमाणेच होते. त्याच्याभोवती भिंती बांधल्या म्हणून आश्‍चर्यचकित होण्याची गरज नाही. कदाचित अमेरिकेमध्ये घरांना कुंपण नसतीलही; पण पाकिस्तानमध्ये कुठलेही घर बांधताना त्याचा मालक आधी कुंपण घालतो. ही अगदी साधी गोष्ट आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.