www.24taas.com, इस्लामाबाद
कुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमझा बिन लादेन हा पाकिस्तानच्या पेशावर भागात लपला असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. अमेरिकन नौदलाने ०२ मे २०११मध्ये अबोटाबाद येथे लादेनच्या घरावर छापा टाकला होता, त्यावेळी हमझा बिन लादेन पेशावरमध्ये दडून बसला होता.
अमेरिकन नौदलाने ज्यावेळेस कारवाई करून लादेनला ठार केले, तेव्हा हमझा पेशावर येथील घरात होता, असे द न्यूज इंटरनॅशनलने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
हमझा हा अल कायदाचा प्रमुख म्हणून स्वतःला सज्ज करीत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. या संदर्भात दहशतवाद विरोधी केंद्राने काही कागदपत्र प्रसिद्धी केले आहेत. हे कागदपत्र लादेनला ठार केल्यानंतर अमेरिकेच्या नौदलाला अबोटाबाद येथे सापडली होती.
हमजा आपली आई खैरिहा साबर हिच्यासह पेशावरमध्ये राहत होता. तसेच ओसामाने या दोघांच्या सुरक्षेवर अधिक भर दिला होता. त्यांच्यावर त्याची करडी नजर होती. या संदर्भात ओसामाने लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, माझा मुलगा आणि त्याची आई यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवा. त्यांच्या सुरक्षेत कोणताही कसूर असता कामा नये. जास्त धोका असल्यावरच त्याला त्या ठिकाणाहून हलवा, असेही नमूद करण्यात आले होते.