एअर मार्शल बट्ट नवे पाक हवाई दल प्रमुख

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल ताहिर रफिक बट्ट यांची नेमणूक करण्यात येणार आहे. बट्ट हे पाक हवाई दलातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहे.

Updated: Feb 29, 2012, 03:55 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद

 
इस्लामाबाद- पाकिस्तानच्या हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल ताहिर रफिक बट्ट यांची नेमणूक करण्यात येणार आहे. बट्ट हे पाक हवाई दलातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी राष्ट्रपतींना बट्ट यांची हवाई दल प्रमुखपदी नेमणुक करण्याविषयी सल्ला दिला होता. सध्याचे एअर चीफ मार्शल राव कमर सुलेमान १७ मार्च रोजी निवृत्त होत आहेत त्यानंतर बट्ट सूत्रं स्वीकारतील.

 

सुलेमान यांनी निवृत्तीच्या वयानुसार पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. बट्ट सध्या हवाई दलाचे उपप्रमुख आहेत आणि सर्वात ज्येष्ठ अधिकारी असल्याने तेच पात्र आहेत. सुलेमान यांना तीन वरिष्ठ हवाई दलातील एअर मार्शल्स डावलत पदोन्नती देण्यात आली होती. सुलेमान यांची १८ मार्च २००९ रोजी पाक हवाई दलाच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली होती.

 

बट्ट मार्च १९७७ मध्ये पाक हवाई दलात रुजू झाले आणि त्यानंतर त्यांनी फायटर स्क्वाड्रन, फायटर विंग, ऑपरेशनल बेस आणि रीजनल एअर कमांडचे नेतृत्व केलं.