उत्तर कोरियाचे सत्ताधीश किम जाँग यांचे निधन

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झालं. नॉर्थ कोरियावर असलेली पोलादी पकड आणि अणवस्त्र सज्ज होण्याच्या महत्वाकांक्षेने साऱ्या जगात सुरक्षेच्या बाबतीत चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं.

Updated: Dec 19, 2011, 12:25 PM IST

 झी २४ तास वेब टीम, मुंबई

 उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झालं. नॉर्थ कोरियावर असलेली पोलादी  पकड  आणि अणवस्त्र सज्ज होण्याच्या महत्वाकांक्षेने साऱ्या जगात सुरक्षेच्या बाबतीत चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं. किम यांनी सतरा वर्षा पूर्वी आपल्या वडिलां कडून कोरियाची सत्ता वारसा हक्काने मिळाली. सिगार, कॉगनॅक आणि उंची खाद्याचे षौकिन असलेल्या किम यांना मधुमेह आणि हृदयरोगाने ग्रासलं होतं.

 

किम यांच्या मृत्यूनंतर दक्षिण कोरियात लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी एका विशेष प्रसारणात अती मानसिक आणि शारिरीक ताणामुळे किम यांचा हदयरोगाने मृत्यु झाल्याचे वृत्त प्रसारित केलं. उत्तर कोरियात सत्ताधीश असलेल्या किम परिवाराच्या करिष्म्याचा प्रभाव असाधारण असा आहे. किम यांचा तिसरा मुलगा उत्तर कोरियाचा नवा सत्ताधीश म्हणून सत्तारूढ होईल. किम यांना २००८ साली पक्षाघाताचा झटका आला होता. पण कोरियाच्या सरकारी माध्यमांनी चीन आणि रशियाच्या दौऱ्यावरच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये ते शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचं चित्रण केलं होतं. उत्तर कोरियाचे संस्थापक किम सुंग यांच्या मृत्यूनंतर १९९४ साली किम जाँग यांनी सत्ता ताब्यात घेतली.

 

 किम यांच्या वडिलांनी वीस वर्षे त्यांना आपल्या तालमीत तयार केलं होतं. कम्युनिस्ट राजवटीच्या उत्तर कोरियाचा भर स्वंय निर्भरतेच्या तत्वावर आहे. पण उत्तर कोरियातील बहुतांश जनता द्रारिद्रयाचा सामना करत आहे. कोरियावर जपानी साम्राज्याच्या राजवटी विरोधात किम सुंग यांनी लढा दिला. जपानच्या दुसऱ्या महायुध्दातल्या पराभवानंतर उत्तर कोरियाच्या सत्ताधीश पदाची किम सूंग यांनी सूत्रं घेतली. महायुध्दानंतर कोरियाचे दक्षिण आणि उत्तर कोरिया असं विभाजन झालं.  दक्षिण कोरियावर अमेरिकेचा तर उत्तर कोरियावर रशियाचा अंमल होता. उत्तर कोरियाने १९५० साली दक्षिण कोरियावर आक्रमण केलं आणि तीन वर्षे चाललेल्या युध्दात लाखो नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील संबंध कायम तणाव पूर्ण राहिले.