आम्लेटमध्ये कांदा नाही म्हणून झाडली गोळी!

उत्तरप्रदेशात गुंडाराज किती फोफावलंय याचं नुकतंच एक उदाहरण समोर आलंय. केवळ, ऑम्लेटमध्ये कांदा घातला नाही म्हणून एका गुंडानं विक्रेत्यावर गोळी झाडलीय.

Updated: Sep 24, 2013, 03:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
उत्तरप्रदेशात गुंडाराज किती फोफावलंय याचं नुकतंच एक उदाहरण समोर आलंय. केवळ, ऑम्लेटमध्ये कांदा घातला नाही म्हणून एका गुंडानं विक्रेत्यावर गोळी झाडलीय.
उत्तर प्रदेशातील इटाहमधील अलिगंज भागात ही घटना घडलीय. या घटनेत ऑम्लेट विक्रेता गंभीर जखमी झालाय. दीपू कश्यप असं या विक्रेत्याचं नाव आहे. सोमवारी, पुजारी नावाचा स्थानिक गुंड आपल्या टोळक्यासह इथं आला होता. दीपूकडे त्यांनी आम्लेटची मागणी केली. दीपूने त्यांची ऑर्डर पूर्ण करत त्यांना ऑम्लेट दिलं. पण, या आम्लेटमध्ये कांदा नसल्यानं पुजारी चांगलाच भडकला. त्यानं दीपूला ‘कांदा का टाकला नाहीस?’ म्हणत जाब विचारला. यावर दिपूनं ‘कांद्याचे भाव वाढल्यानं कांदा वापरणं परवडत नसल्याचं’ सांगितलं. या उत्तरानं भडकलेल्या पुजारीनं दीपू कश्यपवर गोळी झाडली, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
दीपूवर गोळ्या झाडून पुजारी आणि त्याच्याबरोबचे चार साथीदार तिथून निघून गेले. त्यानंतर काही जणांनी जखमी दीपूला रुग्णालयात दाखल करण्यात केलं. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.
या प्रकरणात पोलिसांनी पुजारीविरुद्ध धमकावणे, गोळीबार आणि हत्येचा प्रयत्न या आरोपांखाली गुन्हा दाखल केलाय. आरोपी हा स्थानिक गुंड आहे. याआधीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या हे आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचं पोलीस अधिकारी आशुतोष पांडे यांनी सांगितलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.