लखनऊ : यूपीचे नवे मुख्यमंत्री म्हणून अजय सिंह बिस्त उर्फ योगी आदित्यनाथ शपथ घेणार आहेत. आज दुपारी सव्वा दोन वाजता योगी आदित्यनाथ, 2 उपमुख्यमंत्री आणि इतर 40 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
दिनशे शर्मा आणि उत्तरप्रदेश भाजपचे केशवप्रसाद मौर्य हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील. याशिवाय भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही या शपथविधीचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. सुशासन आणि सबका साथ सबका विकासचा मंत्र घेऊन उत्तर प्रदेशातलं सरकार काम करेल असं आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
लखनऊमध्ये पार पडलेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीत योगी आदित्यनाथ यांच्या मागणीनुसार लखनऊचे महापौर दिनेश शर्मा आणि उत्तरप्रदेश भाजपचे केशवप्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्री करावं असं ठरवण्यात आलं. शनिवारी रात्री नायडू, उत्तरप्रदेशचे प्रभारी ओम माथूर यांच्यासह योगी आदित्यनाथ, केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेचा दावा योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांकडे केला.