रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : काँग्रेसचे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पानीपत झाले असले तरी पंजाबमध्ये त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. या विजयामागे सहा कारणे आहेत.
पंजाबच्या जनतेसमोर मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने सर्वात विश्वासू आणि अनुभवी चेहरा कॅप्टन अमरिंदर सिंग बनले. लोकसभेत पंजाबमध्ये चार जागा मिळवून चांगली कामगिरी करणा-या आम आदमी पार्टीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर दिला नव्हता. तर, अकाली दल आणि भाजपने पुन्हा प्रकाशसिंह बादल यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविली. अकाली दलाचे सरकार आले तरी प्रकाशसिहं बादल यांच्याऐवजी सुखबीर बादल हे मुख्यमंत्री बनणार, त्यापेक्षा वेगळं काही होऊ शकत नसल्याचं मतदारांच्या मनात होतं. त्यामुळे अमरिंदर सिंग यांना वाढदिवसादिवशी मतदारांनी विजयाचं गिफ्ट दिलं.
२०१४ मध्ये मोदींची हवा जोरात सुरू असतानासुद्धा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी विद्यमान वित्त मंत्री अरूण जेटली यांचा अमृतसर येथून पराभव केला होता. पंजाबमधील १० वर्षाची सत्ता घालवण्यासाठी अमरिंदर सिंग हा ठोस पर्याय म्हणून लोकांसमोर आला. तर, आम आदमी पार्टी विश्वास कमावू शकली नाही.
पंजाबमध्ये सरकार विरोधात वातावरण तयार झाले होते. हीच वेळ होती, चांगल्या प्रकारे फायदा उचलण्याची. सतलज यमुना लिंक, ड्रग्जचा व्यवसाय, बादल परिवारावरील भ्रष्टाचाराचे आरोप, यामुळे जनता कंटाळली होती. सतलज यमुना लिंक मुद्द्यावरून तर अमरिंदर सिंग यांनी विधानसभेत आपल्या आमदारांसह राजीनामा दिला होता. अकालीमुळे वैतागलेल्या मतदारांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी खेचले.
मुख्यमंत्रीपदाचे दावेदार घोषित केल्याबरोबर अमरिंदर सिंग यांनी आपल्या प्रमाणे रणनीती बनवली. लोकांमध्ये जाऊन मिसळून मते मागितली. प्रत्येक बूथवर जोरदार पकड बनवली. इथे मतदारांनी काँग्रेसला नाही तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पाहून मते दिली.
पटियाला राजघराण्यातील कॅप्टन अमरिंदर हे लोकांमध्ये महाराजा नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांना काँग्रेसमध्ये आणून त्यांना तिकीट दिले. नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांच्या पत्नीला काँग्रेसकडे आणण्याचे काम कॅप्टन यांनीच केले.
आम आदमी पार्टीची मलिन झालेली प्रतिमा त्यांच्यासाठी धोकादायक ठरली. सेक्स स्कॅडल, बोगस डिग्री, हुंड्यासाठी पत्नीचा छळ या प्रकरणामुळे आप बदनाम झाली. पंजाबमधील महत्त्वाचे नेते सुच्चा सिंग यांना पक्षातून काढणे, भगवंत मान यांना दारू पिल्याचा व्हिडीओ आणि पैसे देऊन तिकीट दिल्याचा आरोपामुळे आपची विश्वासर्हता कमी झाली.