रामराजे शिंदे, दिल्ली : तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून पलानीस्वामी यांनी गुरूवारी शपथ घेतली. 15 दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढं आहे. पलानीस्वामी हे आव्हान पार पाडू शकतील का? हा प्रश्न आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा ताज अखेर ईडाप्पडी के. पलानीस्वामी यांच्या शिरावर विराजमान झालाय. जयललितांच्या निधनानंतर 'एआयएडीएमके'चा वारसदार कोण? यावरून शशिकला विरूद्ध माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यात संघर्ष पेटला. मुख्यमंत्रीपद सोडायला नकार देत, पनीरसेल्वम यांनी केलेलं बंड आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकलांची तुरूंगात रवानगी झाल्यानंतर त्यांचे निष्ठावंत पलानीस्वामी यांच्याकडं सत्तापद आलंय.
शशिकला यांचे विश्वासू ही पलानीस्वामींची खरी ओळख... त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. 1989 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली. 2011 मध्ये ते पहिल्यांदा मंत्री बनले. आत्तापर्यंत पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेत. सलेम जिल्ह्यातील ताकदवान नेते म्हणून ते परिचित आहेत.
तब्बल 123 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी राज्यपालांकडे केलाय. त्यांच्यासह 31 मंत्र्यांचा शपथविधी गुरूवारी पार पडला. आता येत्या 15 दिवसांत बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान त्यांच्यापुढं आहे.
तामिळनाडू विधानसभेत 235 आमदार आहेत. बहुमतासाठी किमान 118 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. एआयएडीएमकेचे 135 आमदार आहेत. त्यापैकी 123 आमदार सोबत असल्याचा पलानीस्वामींचा दावा आहे. द्रमुकचे 89, काँग्रेसचे 8 तर मुस्लिम लीगचा एक आमदार आहे.
सध्या कागदावर तरी पलानीस्वामी मजबूत असल्याचं दिसतंय. पण प्रत्यक्षात विधानसभेत बहुमत सिद्ध होईपर्यंत हे आमदार पाठिशी राहतील का? 2 महिन्यात 3 मुख्यमंत्री तामिळनाडूच्या जनतेनं पाहिले. हा सत्तासंघर्ष आता तरी खरंच संपलाय का? हे लवकरच समोर येईल.