मेरठ : देशात काही ठिकाणी धार्मिक कारणांवरुन अशांततेचे वातावरण असताना देशातील काही लोक मात्र धार्मिक एकतेसाठी आदर्श उदाहरण म्हणून समोर आले आहेत. मेरठमध्ये अशीच एक मुस्लिम चिमुरडी आहे जिला भगवद्गीता पाठ आहे.
रिदा जेहरा जी उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात राहते. ती डोळ्यांनी अंध आहे. परंतु, तिला भगवद्गीतेतील बाराव्या आणि पंधराव्या अध्यायातील सर्वच्या सर्व श्लोक तोंडपाठ आहेत.
शाळेत एक दिवस शिक्षकांनी चिन्मय मिशनच्या गीता पाठांतराच्या स्पर्धेची घोषणा केली. त्यावेळी रिदाने या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने ब्रेल लिपीत लिहिलेली भगवद्गीता मिळवली. या स्पर्धेसाठी खरंतर तिला केवळ पंधरावा अध्याय पाठ करायचा होता. पण, हा अध्याय पाठ करता करता तिला गीतेची गोडी लागली. पुढे तिने बारावा अध्यायही मुखोद्गत केला.
रिदा धर्माने मुसलमान असली तरी तिचा धर्म मात्र याच्या आड आला नाही. रिदाचे वडील मेरठजवळच्याच एका गावात बिरयाणी विकण्याचे एक छोटे दुकान चालवतात. रिदाने राज्यात भगवद्गीता पठन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे याचा तिच्या आई वडिलांना अभिमान आहे.
भगवद्गीतेसोबतच रिदा कुराणाचेही वाचन करते. दोन्ही धर्मग्रंथ शांतीचा संदेश देतात आणि आपल्याही मनाला शांती देतात असे ती सांगायला विसरत नाही.