शारदा चिटफंड घोटाळा : माजी पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

आसामचे माजी पोलीस महासंचालक शंकर बारुआ यांनी बुधवारी आत्महत्या केलीय. आपल्या राहत्या घराच्या गच्चीवरच त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं.

Updated: Sep 18, 2014, 02:13 PM IST
शारदा चिटफंड घोटाळा : माजी पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या title=

गुवाहाटी : आसामचे माजी पोलीस महासंचालक शंकर बारुआ यांनी बुधवारी आत्महत्या केलीय. आपल्या राहत्या घराच्या गच्चीवरच त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं.

चर्चित शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात गेल्याच महिन्यात सीबीआयनं त्यांच्या निवासस्थानाची झाडाझडती घेतली होती. या घोटाळ्यात बारुआ यांना नाहक गोवण्यात आल्यानं त्यांना नैराश्यानं ग्रासलं होतं, असं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलंय. 

बारुआ यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांच्यावर गेल्या आठवड्यापासून स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी त्यांना घरी पाठवण्यात आलं. घरी परतल्यानंतर अर्ध्या तासानं ते आपल्या घराच्या गच्चीवर गेले आणि त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. 

यानंतर कुटुंबीयांनी ताबडतोब बारुआ यांना रुग्णालयात हलवलं. पण, एव्हाना त्यांचा मृत्यू झाला होता, असं गुवाहाटीचे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक ए. पी. तिवारी यांनी म्हटलंय. बारुआ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय. 

दरम्यान, ‘सीबीआय’च्या प्रवक्त्यांनी बारुआ यांची चौकशी करण्यात आली नव्हती किंवा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यातही आलं नव्हतं, अशी माहिती दिलीय. 

लोकप्रिय आसामी गायक सदानंद गोगोई यांच्या समूहाशी बारुआ यांचे संबंध होते व त्यांनी त्या समूहाला संरक्षण दिले, असा आरोप केल्यानंतर बारूआ यांचं नाव शारदा चिटफंड घोटाळ्याशी जोडलं गेलं होतं.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.