www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दोन वर्षांपूर्वी १५ आणि १६ जानेवारीला भारतीय लष्कराच्या तुकडया नवी दिल्लीकडे कूच करत असल्याच्या मीडियात आलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या होत्या, असा खुलासा भारतीय लष्कराच्या `मिलिटरी ऑपरेशन`चे माजी डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल ए. के. चौधरी यांनी `झी मिडिया`शी बोलताना केलाय.
चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, लष्कराच्या ज्या हालचालीबद्दल संशय घेतला जात होता ती लष्कराची एक नियमित कवायत होती आणि त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नव्हतं, असं सांगत दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्कराच्या दोन तुकडया दिल्लीकडे कूच करत असल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमांमध्ये येत होत्या... त्यात काही तथ्य नसल्याचाही खुलासा चौधरी यांनी केलाय.
व्ही. के. सिंग आपल्या जन्मदिवसाच्या मुद्द्यावर सरकारविरुदध १६ जानेवारी, २०१२ रोजी सुप्रीम कोर्टात जात आहेत, याची भनक अगोदरच असती तर सैनिकांची कूच थांबविली जाऊ शकली असती, असंही चौधरी यांनी स्पष्ट केलंय.
तीन आठवड्यांपूर्वीच ए. के. चौधरी सेवानिवृत्त झालेत. या घटनेबद्दल पहिल्यांदाच एका मोठ्या सैन्य अधिकाऱ्यानं उघडपणे आपलं मत नोंदवलंय. चौधरी यांनी ही घटना म्हणजे, `दोन लोकांमधला वाढता अविश्वास आणि दोन पक्षांची अपरिपक्वता यांचा मेळ होती`. योग्य संवाद साधला गेला असता तर या परिस्थितीतून जाण्याची वेळ आली नसती, असंही त्यांनी म्हटलंय.
याचवेळेस, चौधरी यांनी हेही नमूद केलयं की या बातम्यांमुळं त्यावेळचे डिफेन्स सेक्रेटरी शशिकांत शर्मा यांनी चौधरी यांच्याकडे सैन्याच्या हालचालींबद्दल चिंता व्यक्त केली होती. लेफ्टनंट चौधरींच्या मते, सरकारनं सैन्याच्या या नियमित हालचालींबद्दल एव्हढ चिंतित होण्याची गरज नव्हती. सैन्यांच्या हालचालींबद्दल सगळी माहिती डिफेन्स सेक्रेटरी शर्मा यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांची खात्री पटली, असा खुलासारी लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.