तमिळनाडू : ट्रेनचं छत तोडून करोडोंची रक्कम लंपास करण्याचा प्रकार तमिळनाडूत घडलाय. 226 पेट्यांमधून जुन्या, फाटलेल्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवल्या जात होत्या. एकूण 340 कोटी रूपये रकमेपैकी 5 कोटी रुपये चोरीला गेले आहेत.
11064 सेलम-चेन्नई इग्मोर एक्सप्रेसद्वारे ही रक्कम सेलमहून चेन्नईला नेली जात होती. सोमवारी रात्री 9 वाजता सेलमहून निघालेली ट्रेन मंगळवारी संध्याकाळी चेन्नईला पोहोचली.
या डब्याच्या सुरक्षेसाठी 18 अधिकारी आणि जवान तैनात करण्यात आले होते. पण तरीही ट्रेन चेन्नईला पोहोचेपर्यंत या घटनेबाबत कोणालाही काहीच कल्पना नव्हती. आरबीआय अधिकाऱ्यांनी हा डबा उघडल्यानंतर चार पेट्यांतली रक्कम चोरीला गेल्याचे कळले.
सेलम आणि विरधाचलम दरम्यान ही चोरी झाली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कारण या मार्गावरील लाइन इलेक्ट्रिफाइड नाही. या 138 किमीच्या अंतरात ट्रेन डिझेलवर चालते. याचवेळी ट्रेनच्या छतावरुन एक माणूस सहज आत-बाहेर ये-जा करू शकेल इतका भाग कापून ही चोरी करण्यात आली. ही रक्कम शोधण्यासाठी सेलम ते चेन्नई सर्व स्थानकांवर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.