नवी दिल्ली : ललित मोदी यांना भारतात येण्यासाठी ट्रॅव्हल्स व्हिसा देण्यास मदत केल्या प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज अडचणीत आल्या आहेत. ललित मोदी हे आयपीएलमधील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आहेत.
या प्रकरणी ललित मोदींना व्हिसासाठी मदत करणारे ब्रिटनमधील खासदार केथ वॅझ यांनीही चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
सुषमा स्वराज यांनी स्वतः ट्विटरवरून आपण माणुसकीच्या नात्याने ललित मोदी यांना भारतात येण्यासाठी मदत केल्याचे स्पष्ट केले आहे.
स्वराज म्हणाल्या, 'गेल्यावर्षी जुलै महिन्यात ललित मोदी यांना पुन्हा भारतात येण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी माझा मोदींशी संपर्क झाला होता.
ललित मोदी यांनी आपल्याला त्यांची पत्नी कर्करोगाने त्रस्त असल्याचे आणि तिच्यावर ४ ऑगस्टला पोर्तुगालमध्ये शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार मी रुग्णालयाच्या कागदपत्रांच्या आणि माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्यांना भारतात येण्याची परवानगी दिली होती, असं स्वराज यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणी विरोधी पक्षांकडून सुषमा स्वराज यांना लक्ष्य करण्यात येत आहे. काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, जदयू या पक्षांनी स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.