माजी पंतप्रधान मनमोहन सिंहवर लवकरच येणार चित्रपट

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दहा वर्षे भारताचे नेतृत्व करणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे.

Updated: Jun 13, 2016, 05:53 PM IST
माजी पंतप्रधान मनमोहन सिंहवर लवकरच येणार चित्रपट title=

मुंबई : कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना दहा वर्षे भारताचे नेतृत्व करणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे.

संजय बारू लिखित 'द अॅक्सिडेंटल पीएम' या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असेल. येत्या ३० ऑगस्ट रोजी चित्रपटाचा 'टीझर' रिलीज होईल. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत तो प्रदर्शित होईल असा अंदाज आहे.

संजय बारू हे २००४-२००८ या काळात मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार होते. बारु यांचे 'द अॅक्सिडंटल पीएम' हे पुस्तक २०१४ साली प्रदर्शित झाले होते. या पुस्तकात काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर प्रकाश टाकण्यात आल्याने ते वादाच्या चक्रात अडकलेले. त्यामुळे हा चित्रपट कसा असेल याबद्दल अनेकांना उत्सुकता असेल.

भारताचे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या अंत्यसंस्कारांवरून झालेले वाद यांसारख्याच अन्य प्रकरणांचा समावेश चित्रपटाच्या 'टीजर'मध्येच असल्याने चित्रपट वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

चित्रपटाच्या 'टीझर'पासूनच ही उत्सुकता ताणण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. भारतात व जगभरात विविध भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

यातील मनमोहन सिंग यांच्या भूमिकेसाठी पंजाबमधील एका तरुण अभिनेत्याची निवड करण्यात आली असून सोनिया व राहुल यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्यांचा शोध सुरू आहे.

तर अभिनेते मनोज वाजपेयी यांचा संजय बारु यांच्या भूमिकेसाठी विचार सुरू आहे. हा एक निखळ मनोरंजन करणारा चित्रपट असेल, माहितीपट नसेल,' असं चित्रपटाचे निर्माते सुनील बोहरा यांनी 'इकॉनॉमिक टाइम्स'शी बोलताना सांगितले.