नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मंगळवारी वाराणसीमध्ये रॅलीसाठी दाखल झाल्या. रॅलीला सुरुवात झाली. मात्र, अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीला परतावे लागले.
दरम्यान, दुसरीकडे त्यांच्या प्रकृतीची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर त्यांची प्रकृती लवकरच ठिक व्हावी यासाठी प्रार्थना देखील केली. मोदींचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या वाराणसीमध्ये सोनियांनी शक्तीप्रदर्शनला सुरूवात केली. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील जमले होते. इतकेच नाही तर या शक्तीप्रदर्शनामध्ये विमानतळापासून ते सर्किट हौसच्या रस्त्यावर १० हजार दुचाकींचा ताफा होता.
सोनिया गांधी यावेळी तब्बल ६ किलोमीटर अंतर रॅलीमध्ये सहभागी झाल्या. नंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्या दौरा अर्धवट सोडून दिल्लीकडे रवाना झाल्या. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्या दिल्लीकडे परतल्या.
गेल्या २७ वर्षांपासून काँग्रेसला उत्तरप्रदेशमध्ये सत्ता मिळवता आलेली नाही. त्यामुळे येथील सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी काँग्रेसने रॅली आयोजित केली होती. यावेळी उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित, युपी काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर उपस्थित होते.
Heard about Sonia ji’s ill health during her Varanasi visit today. I pray for her quick recovery and good health.
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2016