एका ट्विटनं घडवली आई आणि तीन मुलांची भेट!

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या एका कोपऱ्यात घाबरलेल्या गोंधळलेल्या अवस्थेत बसलेल्या तीन मुलांचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरवरून एकानं शेअर केला... आणि याच ट्विटमुळे अद्भूत असा प्रसंग घडला. हाच ट्विट दिल्ली पोलिसांच्या एका चौकस अधिकाऱ्यानं आणि बाल कल्याण संस्थेनं आपल्या आईपासून दूर झालेल्या तीन मुलांना केवळ तीन तासांत आपल्या घरी पोहचवलं.

Updated: Mar 19, 2015, 10:21 AM IST
एका ट्विटनं घडवली आई आणि तीन मुलांची भेट! title=

नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या एका कोपऱ्यात घाबरलेल्या गोंधळलेल्या अवस्थेत बसलेल्या तीन मुलांचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरवरून एकानं शेअर केला... आणि याच ट्विटमुळे अद्भूत असा प्रसंग घडला. हाच ट्विट दिल्ली पोलिसांच्या एका चौकस अधिकाऱ्यानं आणि बाल कल्याण संस्थेनं आपल्या आईपासून दूर झालेल्या तीन मुलांना केवळ तीन तासांत आपल्या घरी पोहचवलं.

या घटनेची सुरुवात मंगळवारी रात्री उशीरा नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १६ वर झाली. रहनुमा ( ७ वर्ष), राजा ( ५ वर्ष) आणि सान्या (४ वर्ष) प्लॅटफॉर्मवर थकलेल्या, भांबावलेल्या अवस्थेत दिसले. याच दरम्यान, आपल्या एका नातेवाईकाला सोडण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीनं या तिघांना पाहिलं आणि त्यांचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंट 'अॅटदरेट अभिषेक ११२२' वरून शेअर केला. 

'नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर १६ च्या गेटवर असलेल्या या असहाय्य मुलांची कुणी मदत करू शकेल का?' असं या ट्विटमध्ये म्हटलं होतं. या ट्विटनंतर लगेचच कुणीतरी 'चाईल्ड हेल्पलाईन १०९८' वर संपर्क केला आणि ही माहिती त्यांना दिली. 

अधिकाऱ्यांनीही तत्परता दाखवत आपली टीम रेल्वे स्टेशनवर धाडली. पण, या वेळेपर्यंत गर्दीला घाबरून या तीन मुलांनी आपली जागा सोडली होती. परंतु, एव्हाना या मुलांचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला होता. एक वरिष्ठ पत्रकार, स्वयंसेवी संघटना तसंच दिल्ली पोलीस उपायुक्त मधुर वर्मा लगेचच सक्रीय झाले. वर्मा यांनी या मुलांना शेवटचं जिथे पाहिलं गेलं होतं त्याची माहिती घेतली... आणि शोध सुरू केला. पोलीस आणि उदय फाऊंडेशनसहीत अनेक लोकांच्या मदतीनं जवळपास तीन तासांच्या शोधानंतर मुलांना शोधून काढण्यात यश मिळालं. हे तिघेही प्लॅटफॉर्म नंबर १६ हून प्लॅटफॉर्म नंबर १ वर गेले होते. 

मुलं खूप घाबरलेली होती... भूकेलेली होती. पोलिसांनी त्यांना व्यवस्थित हाताळून त्यांची जेवण्याची व्यवस्था करून त्यांना विश्वासात घेतलं. त्यानंतर या मुलांकडून ते नबी करीम भागात राहत असल्याचं समजलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे या मुलांचा बापच त्यांना इथे घेऊन आला होता... आणि आई येईपर्यंत त्यांना स्टेशनवरच थांबण्यास सांगून तिथून निघून गेला होता. 

नबी करीम भागातील एका अरुंद गल्लीत त्यांची आई तबस्सूम (३७ वर्ष) आपल्या घरात झोपलेली होती. मुलं घरी नसताना आई घरी निश्चिंत कशी झोपू शकते? असा प्रश्न विचारल्यावर तिनं त्यांचा बाप मुलांना नेहमीप्रमाणे घेऊन गेला होता... आणि ती कामानं थकून घरी येऊन झोपली होती... असं सांगितलं. सकाळी उठल्यानंतर मुलांचा शोध घेता येईल, असं म्हणून आपण पोलिसांकडे गेलो नाही, असंही तिनं सांगितलं. तबस्सूमला एकूण ७ मुलं आहेत. तिचे आणि तिच्या पतीचे संबंध चांगले नाहीत... दोघेही वेगवेगळे राहतात. तिचा पती कानपूरमध्ये राहतो.  

एका ट्विटमुळे सुरू झालेला हा प्रवास पोलिसांच्या प्रयत्नामुळे तीन मुलांना सुरक्षित त्यांच्या घरी आईजवळ सोडल्यानंतर संपला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.