लखनऊ : 'बाबर, अकबर हे मुघल सम्राट फक्त घुसखोर होते. शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग हेच देशाचे खरे हिरो आहेत', असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते उत्तरप्रदेशमध्ये महाराणा प्रताप यांच्या जंयतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
'देशाचे खरे हिरो कोण? हे आपल्याला समजले पाहिजे. सम्राट अकबर, बाबर हे मुघल राजे केवळ घुसखोर होते. हे आपण एकदा मान्य केले तर देशाच्या सर्व समस्या सुटण्यास सुरुवात होईल', असे योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.
'देशाचे खरे हिरो असलेल्या थोर व्यक्तिंचा गौरव झाला पाहिजे. त्यांच्या चरित्राचा अभ्यास करुन त्यापासून प्रेरणा घेतल्यास आपल्याला आयएसआय, आयसिससारख्या दहशतवादी संघटनाची भिती वाटणार नाही', असे आदित्यनाथ यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंगदेखील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल यांनी आदित्यनाथ यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची स्तूती केली.
'आदित्यनाथ धडाकेबाज पध्दतीने काम करत असून त्यांच्या कामांची दखल देशभरात घेतली जात आहे', असे रामनाईक म्हणाले.