नवी दिल्ली : माहितीच्या अधिकारातून एक धक्कादायक माहिती समोर आलीये. नवी दिल्लीतल्या १६ शिक्षण संस्थांमधून लैंगिक शोषणाच्या तब्बल १०१ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
दिल्ली महिला आयोगाने २३ शिक्षण संस्थांकडून २०१३ ते नोव्हेंबर २०१५ पर्यंत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची माहिती मागवली होती. याअंतर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे, दिल्ली विद्यापीठात लैंगिक शोषणाच्या तक्रारींचा एकूण आकडाच उपलब्ध नाही. तर इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल महिला विद्यापीठात चौकशी दरम्यान खोट्या तक्रारी केल्याचंही आढळून आलंय.
त्याचप्रमाणे आयआयटी दिल्ली, आयजीएनओयू, जामिया मिल्लिया इस्लामिया आणि एम्समध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. आरटीआय कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीमध्ये जवाहर लाल नेहरु विद्यापीठात सर्वाधिक लैंगिक शोषणाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. एकट्या जेएनयूमध्ये गेल्या वर्षी लैंगिक शोषणाच्या ५१ तक्रारी दाखल झाल्या तर अन्य २२ शिक्षण संस्थामधून ५५ लैंगिक शोषणाची प्रकरणे समोर आली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.