www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे आघाडीचे नेते नरेंद्र मोदी यांचे खरे मूल्य ५ रूपये असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या सभेसाठी प्रत्येकाला आता ५ रूपये मोजावे लागणार आहे. भाजपने हैदराबादमधील सभेसाठी चक्क ५ रुपयांचे तिकीट लावले आहे.
देशात मोदी वारे वाहत आहेत. त्यांच्या सभा घेण्याचा सपाटा लावण्यात आलाय. मोदी यांची पुण्यात रविवारी सभा झाली. ही सभा यशस्वी झाल्याचा दावा भाजपन केलाय. मोदींची लोकप्रियता कॅश करण्याचा डाव भाजपकडून साधण्यात येत आहे. त्याची सुरूवात हैदराबादमधून होत आहे. मोदींच्या सभेसाठी चक्क ५ रुपयांचे तिकीट लावले आहे.
भाजपच्या या नव्या तिकिट सभेवर जोरदार टीका होता आहे. काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी हल्ला चढवलाय. भाजप मनी कॅश असल्याचे त्यांनी म्हटलेय. मात्र, भाजपने हा पैसा आम्ही मदतीसाठी वापरणार असल्याचे म्हटलेय. या सभेला तिकीट लावून मिळालेला पैसा उत्तराखंडातील पुरामुळे फटका बसलेल्या पीडिताना देण्याची घोषणाही पक्षाने केलेय.
मोदी यांची हैदराबाद येथील ही सभा आधी २७ जुलै रोजी ठेवण्यात आली होती. आता ती ११ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. राज्यातील ग्राम पंचयात निवडणुकांमुळे कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. मोदी यांच्या सभेसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू असून, १० ऑगस्टपर्यंत ते चालणार आहे.
हैदराबाद येथील लालबहादूर स्टेडियमवर ही सभा असून, १८ ते ४० वयोगटातील एक लाख लोक मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी येतील, अशी अपेक्षा आहे. ४० हजार लोकांनी आताच बुकिंग केले असून, हा आकडा ७० हजारांपर्यंत जाईल, असे पक्षाला अपेक्षित आहे.
भाजपकडून अजब दावा करण्यात आलाय. अन्य राजकीय पक्ष लोकांना सभास्थानी आणण्यासाठी पैसे खर्च करतात. नरेंद्र मोदी एकट्याच्या बळावर प्रचंड जनसमुदाय सभास्थानी आणू शकतात. असे असेल तर मोदी यांच्या सभेसाठी फी का लावू नये, असा दावा आंध्र प्रदेश भाजपाचे प्रवक्ते एन रामचंद्र यांनी केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.