मुंबई : तुमच्याकडे असलेल्या फाटक्या नोटा आता फुकटात बदलून मिळणार आहेत. तुमच्या बँकेमध्ये जाऊन या नोटा बदलता येणार आहेत. आरबीआयनं तसे आदेश सगळ्या बँकांना दिले आहेत. फाटलेल्या जास्तीत जास्त 20 नोटा किंवा जास्तीत जास्त 5 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा तुम्हाला बदलून मिळणार आहेत. एखादा ग्राहक रोज नोटा बदलायला येत असेल तर त्याकडे लक्ष देण्याचे निर्देशही आरबीआयनं बँकांना दिले आहेत.
यापेक्षा जास्त रकमेच्या नोटा फाटलेल्या असतील तर बँका त्यावर शुल्क आकारणार आहेत. याआधी ज्या बँकांमध्ये करन्सी चेस्ट होती तिकडेच या सुविधा मिळत होत्या. आता मात्र प्रत्येक बँकेमध्ये ही सुविधा मिळणार आहे.
खराब नोटांची किंमत पाच हजारांपेक्षा जास्त असल्यास बँक ग्राहकांना पावती देईल. या फाटलेल्या नोटांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर या नोटा करन्सी चेस्ट शाखेकडे पाठवण्यात येतील. करन्सी चेस्ट शाखेकडून परवानगी मिळाल्यानंतर ग्राहकाला नोटा बदलून देण्यात येतील.