मुंबई : रिजर्व्ह बँकेनं आज जाहीर कलेल्या पतधोरणात रेपो, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआरमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
व्याज दरांमध्ये घसरण होण्याची अपेक्षा संपुष्टात आल्यानं 'ईएमआय' कमी होण्याची शक्यताही मावळलीय. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी व्याज दरांमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं.
सध्याचा सीआरआर ४ टक्क्यांवर आहे. इतर वाणिज्यिक बँकांना रिझर्व्ह बँकेकडे 'सीआरआर' दरानुसार आपल्याक़डे जमा असलेल्या राशीचा ठराविक भाग जमा करावा लागतो. यावर रिझर्व्ह बँकेकडून या बँकांना व्याज मात्र मिळत नाही.
तर, सध्याचा रेपो रेट ७.५ टक्के आहे. रेपो रेट म्हणजे केंद्रीय बँक इतर बँकांना तत्कालिक कारणांसाठी आवश्यकता भासल्यास ज्या दरावर कर्ज देते तो दर...
यापूर्वी बँकेनं दोन वेळा पतधोरणा व्यतिरिक्त व्याज दर कपात केली होती. मात्र, अद्याप बँकांनी ही कपात ग्राहकांपर्यंत पोहोचवलेली नाही. त्यामुळे बँकांनी आपले व्याज दर कमी करावेत, असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलंय.
बँकांनी व्याज दर घटवल्यानंतरच यापुढे रेपो रेट कमी करण्याबाबत विचार होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आज जाहीर झालेल्या पतधोरणात २०१५-१६ साठी ७.८ टक्के विकासदराचं उद्दिष्ट ठेवलंय.
पुढल्या आर्थिक वर्षात रिटेल इन्फ्लेशन ५ ते ५.५ टक्क्यांच्या दरम्यान असेल, असा अंदाज आरबीआयनं वर्तवलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.