नवी दिल्ली : देशातली पहिली इको फ्रेंडली ट्रेनचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलंय. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोटचं बटन दाबत या रेल्वेगाडीचं उदघाटन केलं.
हरियाणामध्ये रेवाडी ते रोहतक दरम्यान पहिल्या सीएनजीवर धावणाऱ्या ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्यात आला. ही गाडी डिझेलसोबतच सीएनजीवरही धावू शकणार आहे.
यासाठी रेल्वेने १४०० हॉर्सपॉवरचं इंजिन तयार केलंय. रेवाडी आणि रोहतक यांच्यातलं अंतर ८१ किलोमीटर आहे. त्यापैकी २४ किलोमीटरचं अंतर ही गाडी सीएनजीच्या आधारे चालवण्यात येईल. या गाडीला दोन पॉवर कोच आणि ६ सामान्य कोच आहेत. हे डब्बे चेन्नईच्या कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आले आहेत. यागाडीचे सीएनजी सिलेंडर्स गाडीच्या शेवटच्या डब्यात लावलेले आहेत. डिझेलच्या तुलनेत सीएनजीवर गाडी चालवल्याने तब्बल ५० टक्के खर्च कमी होणार आहे.
रविवार सोडून आठवड्यातील इतर सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे. ही रेल्वे दररोज सायंकाळी ७.५० वाजता रेवाडी सोडेल... रात्री १०.१० वाजता ती रोहतला दाखल होईल.... परत येताना हीच ट्रेन पहाटे ५.०० वाजता रोहतक सोडून ७.०० वाजता रेवाडीला दाखल होईल.
यावेळी, प्रभू यांनी रेवाडी - बिकानेर या रेल्वेचंही उद्घाटन केलंय. या दोन्ही रेल्वे अर्थसंकल्प २०१४-१५ मध्ये जाहीर करण्यात आल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.