www.24taas.com, नवी दिल्ली
एखाद्या स्टेशनवरून निघालेली रेल्वे सध्या कुठे पोहचलीय याची माहिती तुम्हाला आता सहज मिळणं शक्य होणार आहे. रेल्वे आणि गुगल मॅप यांनी एकत्र येऊन ‘रेल रडार’ नावाची नवी प्रणाली विकसित केलीय. याच रेल रडारमुळे रेल्वेचं त्या त्या क्षणाचं लोकेशन ट्रॅक करता येणार आहे.
रेल्वेच्या trainenquiry.com (ट्रेन एन्क्वॉयरी) या वेबसाईटवर ही सुविधा सुरू करण्यात आलीय. यामध्ये रेल्वेचं नाव आणि क्रमांक टाकल्यानंतर ती रेल्वे सध्या नेमक्या कोणत्या ठिकाणावरून धावतेय याची माहिती मिळेल. त्यामुळेच रेल्वे उशीरानं धावतेय की वेळेत पोहचणार हे समजणंही सोपं होणार आहे. स्टेशनचे नाव टाकल्यास ती रेल्वे त्या स्टेशनमध्ये केव्हा येणार, कधी सुटणार याचीही माहिती मिळणार आहे. कोणत्याही दोन स्टेशनचे नाव दिल्यास त्या स्टेशनदरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेची माहिती स्क्रीनवर दिसणार आहे. एव्हढंच नव्हे तर ती रेल्वे त्या स्थानकांत नेमकी केव्हा पोहचेल याचीही वेळ या ‘रेल्वे रडार’मुळे मिळणार आहे. ‘रेल रडार’मध्ये विविध रंगांचा (कलर कोड) सांकेतिक वापर करण्यात आलाय. वेळेत धावणाऱ्या रेल्वेंसाठी निळा तर उशिराने धावणाऱ्या रेल्वेंसाठी लाल रंगाचा वापर करण्यात आलाय.
देशभरात रोज १० हजारांहून अधिक रेल्वे धावतात त्यापैकी ६५०० रेल्वे रडारवर आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिलीय. रेल रडार सध्या पथदर्शक म्हणून कार्यान्वित करण्यात आले असलं तरी नंतर ते कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे.