मुंबई : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्यानंतर त्यावर सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदींच्या या निर्णयावर टीका केल्याचा एक मराठी मेसेज सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतं आहे. एका इंग्रजी वेबसाईटला राजन यांनी ही मुलाखत दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
पण अशा कोणत्याच वेबसाईटला रघुराम राजन यांनी मुलाखत दिलेली नाही. राजन यांनी मोदींच्या या निर्णयावर आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचं वृत्त द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नोटबंदीबाबत त्यांच्या वैयक्तिक ब्लॉगवर विश्लेषण केलं होतं. आव्हाड यांचं हे विश्लेषण रघुराम राजन यांचंच असल्याचं सांगत हा मेसेज व्हायरल झाला आहे.
माझं विश्लेषण रघुराम राजन यांच्या नावानं व्हायरल केल्यामुळे मला धक्का बसला आहे. नागरिकांच्या भावना मी माझ्या ब्लॉगमधून व्यक्त केल्या आहेत. या ब्लॉगमुळे माझ्यावर मोदी समर्थक टीका करतील असं वाटत होतं, पण माझ्या ब्लॉगची प्रशंसा होत आहे. मला समजणारं अर्थशास्त्र जनतेच्या बाजूचं आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी द हिंदू ला दिली आहे.