www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
२०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग प्रथमच आज पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच बोलणार आहेत. त्यातच पंतप्रधानपदाची सेकंड इनिंग संपण्याआधी ते मीडियाला सामोरे जात असल्यानं ते काय बोलतायत, याकडे सगळ्या देशाचंच लक्ष लागलंय.
फारसे न बोलणारे पंतप्रधान ही डॉ. मनमोहन सिंह यांची ओळख. गेली दहा वर्षे ते देशाचे पंतप्रधानपद भूषवत आहेत. परंतु एखाद्या मुद्यावर संसदेत किंवा बाहेरही त्यांनी तोंड उघडल्याची उदाहरणं काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाच्या म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच. २००९ मध्ये दुस-यांदा पंतप्रधान झाल्यानंतर २०१० मध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी ते आज पत्रकारांना सामोरे जाणार आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीआधी आपल्या दोन टर्मच्या काराकिर्दीचं सिंहावलोकन ते कसं करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषीत करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षात जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी घेण्याची इच्छा नसल्याचं मनमोहन सिंग यांनी याआधीच स्पष्ट केलंय. नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. वाढती महागाई आणि भ्रष्टाचार या दोन कारणांमुळे पराभव झाल्याचं कॉग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यात पंतप्रधानांच्या कमकुवत प्रतिमेचाही फटका बसल्याची चर्चा अनेकजण खासगीत करतात. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनीही वारंवार त्यांच्यावर टीका केलीये.त्यामुळे आज मनमोहन सिंग आपल्या टीकाकारांना कसं उत्तर देतात, हे पाहणं गरजेचं आहे.
डॉ.मनमोहन सिंग यांच्यासारखी नावाजलेली अर्थतज्ज्ञ व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान असताना, देशातील आम आदमी आर्थिक मंदी आणि महागाईनं त्रस्त आहे. या बोच-या टीकेचा सामना ते कसा करतात, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस यूपीए सरकारच्या विकासाच्या योजना घेऊन लोकांसमोर जाणार आहे. अशावेळी स्वतःचं म्हणणं देशासमोर मांडण्याची संधी त्यांना प्राप्त झालीय. पंतप्रधान म्हणून स्वतःची बाजू ते कशी मांडतात, हे यानिमित्तानं देशाला दिसणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ