राष्ट्रपतींचं आणखी पाच जणांच्या फाशीवर शिक्कामोर्तब

अजमल कसाब आणि अफजल गुरूच्या फाशीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आणखी सात द्या अर्ज निकालात काढलेत.

Updated: Apr 4, 2013, 01:18 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अजमल कसाब आणि अफजल गुरूच्या फाशीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आणखी सात द्या अर्ज निकालात काढलेत. या सात अर्जांमधील पाच जणांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घेतलाय. तर उरलेल्या दोघांच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्यात आलंय.
राष्ट्रपतींनी फेटाळलेल्या अर्जांमध्ये हरियाणाच्या धर्मपालचाही समावेश आहे. बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या धर्मपालनं पॅरोलवर सुटल्यानंतर बलात्कार पीडित मुलीच्या परिवारातील पाच जणांचा खून केला होता. धर्मपालच्या द्या याचिकेवर १४ वर्षात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पुढच्या आठवड्यात होऊ शकते.
गृहमंत्रालयानंही राष्ट्रपतींना पाठवलेल्या सात अर्जांपैकी पाच अर्जांना फेटाळण्याचा आणि दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती केली होती. राष्ट्रपतींनीही ही विनंती अंमलात आणलीय. यातील जन्मठेप म्हणजे १४ किंवा २० वर्ष नसून मरेपर्यंत तुरुंगवार आहे.
राष्ट्रपतींनी ज्या सात अर्जांवर निर्णय दिलाय ते पुढीलप्रमाणे
गुरमीत सिंह : उत्तर प्रदेशच्या गुरमीत सिंहला १७ ऑगस्ट १९८६ साली एकाच कुंटुबातील १३ लोकांची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
सुरेश आणि रामजी : उत्तर प्रदेशमधील अन्य एका प्रकरणात या दोघांना आपल्याच भावाच्या कुटुंबातील पाच जणांचा खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
रेलूराम पुनिया ह्त्याकांड : यामध्ये हरियाणात गाजलेल्या रेलूराम पुनिया हत्याकांडात हरियाणाच्या एका माजी आमदाराची मुलगी सोनिया आणि तिचा नवरा संजीव यांचाही सहभाग आहे.
सुंदर सिंह : उत्तराखंडातील सुंदर सिंह याला बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
जफर अली : उत्तर प्रदेशच्या जफर अलीला २००२ मध्ये आपली पत्नी आणि पाच मुलींच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा झाली होती.

धर्मपालचं प्रकरण
धर्मपालनं १९९३ मध्ये एका मुलीवर बलात्कार केला होता या प्रकरणात त्याला दहा वर्षांची शिक्षा झाली होती. जेव्हा तो पॅरोलवर सुटला तेव्हा त्यानं याच मुलीच्या कुटुंबातील पाच जणांची काठीनं बदडून बदडून हत्या केली. धर्मपालच्या भावानं निर्मलनंही त्याला याप्रकरणात मदत केली होती. दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १९९९ साली सुप्रीम कोर्टानंही धर्मपालची शिक्षा कायम ठेवली. निर्मलची शिक्षा कमी होऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. २००१ साली पॅरोलवर सुटलेला निर्मल फरार झाला होता. त्याला तब्बल १० वर्षानंतर पुन्हा अटक झाली.