बंगळूरू : आई आपल्या बाळासाठी काय करत नाही, त्याचा आणखी एक थरारक अनुभव नुकताच उत्तर कर्नाटकातल्या यादगीर जिल्ह्यात आला आहे.
उत्तर कर्नाटकातून वाहणा-या कृष्णा नदीला सध्या पूर आलाय. या महापुरानं नीलकात रायणागडे गावाला वेढा घातलाय. याच पुरात गावातली येल्लावा नावाची नऊ महिन्यांची गर्भवती महिला अडकली.
तिचा प्रसृतीकाळ जवळ येत होता. गावात एकही रूग्णालय नव्हतं. चार किलोमीटरवर रुग्णालय होतं, पण तिथं पोहोचण्यासाठी तिला पुरामुळं दुथडी भरून वाहणारी नदी पार करावी लागणार होती. या गर्भवतीनं त्या परिस्थितीतही पुराच्या वाहत्या पाण्यात बिनधास्त उडी टाकली.
आपल्या बाळाचा सुरक्षित जन्म व्हावा यासाठी, पुढे तिचा भाऊ आणि मागे वडिल, त्यांच्या मदतीनं तिनं 90 मिनिटे पोहून कृष्णा नदी पार केली आणि ती रूग्णालयात पोहोचली.
तिथं येल्लावानं गोंडस बाळाला जन्म दिला. येल्लावा आणि तिच्या बाळाची प्रकृती आता उत्तम आहे. आपल्या बाळासाठी पुराच्या पाण्यात उडी घेण्याचं धाडस करणा-या या मातेला सलाम.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.