जे केलं ते आम्हीच केलं – राहुल गांधी

देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वकाही करणार असे सांगितले होते. गेल्या आठ वर्षांपासून आम्ही सरकार चालवत असून, आम्ही अनेक गोष्टी करून दाखविल्या आहेत, असे काँग्रेसचे महासचिव आणि खासदार राहुल गांधी यांनी आज सांगितले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 4, 2012, 04:17 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वकाही करणार असे सांगितले होते. गेल्या आठ वर्षांपासून आम्ही सरकार चालवत असून, आम्ही अनेक गोष्टी करून दाखविल्या आहेत. मनेरगाच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना रोजगार मिळवून दिला आहे. आम्ही माहितीचा अधिकार (आरटीआय) सारखा कायदा स्थापन करून सरकारला कोणीही प्रश्न विचारण्याची सोय करून दिली आहे, असे मत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज व्यक्त केले.
काँग्रेसने आज रामलीला मैदानावर रिटेल क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीच्या (एफडीआय) निर्णयाच्या समर्थनासाठी भव्य सभेचे आयोजन केले होते. या सभेला देशभरातून लाखो नागरिकांनी गर्दी केली होती. या सभेला पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह मुख्यमंत्री उपस्थित होते.
राजकीय व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणसांचा आवाज ऐकला जात नाही. भ्रष्टाचाराला विरोध करताना ज्याप्रमाणे आवाज उठविला जातो. तसा राजकीय व्यवस्था बदलण्याबाबत विरोधी पक्षांकडून उठविला जात नाही. सर्वसामान्य नागरिक आणि युवक राजकारणात येईपर्यंत देशात बदल होणे कठीण आहे.
राहुल गांधी म्हणाले, आरटीआयमुळेच गैरव्यवहार बाहेर येत आहेत. विरोधी पक्ष नुसतेच भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे आणून नागरिकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने घेतलेल्या `एफडीआय`च्या निर्णयाचा शेतकरी आणि सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. सरकारची भूमिका समजून न घेता विरोधी पक्ष टीका करत आहेत. विरोधी पक्ष फक्त नकारात्मक भूमिका मांडत आहेत.
अपप्रचार होतोय - पंतप्रधान
धोरणांचा अपप्रचार करण्यात येत आहे. आर्थिक पुनर्रचनेशिवाय रोजगार निर्मिती अशक्य आहे. व्यापाराच्या योग्य वातावरणासाठी गुंतवणूक आवश्यक आहे. भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सर्वांना समान संधी मिळण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असून, प्रत्येकाची प्रगती व्हावी, हा सरकारचा उद्देश आहे, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणाले.
भारताला समृद्ध बनविण्यासाठी आपल्याला नवीन योजना स्वीकाराव्या लागणार आहेत. गरिबांच्या हितासाठी काँग्रेसने प्रयत्न केले आहेत. परंतु, सरकारच्या निर्णयांबाबत अफवा पसरवून नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. उद्योग, रोजगार वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आर्थिक विकासदर वाढीवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर आमचा भर आहे. भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. भ्रष्टाचार नष्ट करण्याला आमचे प्राधान्य असेल, असे पंतप्रधान म्हणाले.
विरोधकांचा खोडा - सोनिया
देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास विरोधी पक्षांतील नेत्यांचा विरोध आहे. विरोधक महत्त्वाची विधेयके मंजूर होऊ देत नाहीत. लोकपाल विधेयक आम्ही आणले, पण भारतीय जनता पक्षाने राज्यसभेत हे विधेयक मंजूर होऊ दिले नाही. त्यामुळे विरोधक लोकशाहीला कमकुवत करण्याचा प्रय़त्न करत आहेत. भ्रष्टाचार हा एक प्रकारचा रोग असून, भ्रष्टाचार करणाऱ्यांना माफी नाही. भ्रष्टाचारावर टीका करणारेच भ्रष्टाचाराच्या गाळात अडकले आहेत, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.