मोदींना व्हायचं नाही 'डॉक्टर'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठाकडून त्यांच्या सन्मानार्थ दिली जाणारी डॉक्टरेट ही पदवी नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. अशी पदवी घेणे आपल्याला पटत नसल्याचं कारण देऊन त्यांनी ती घ्यायला नकार दिला आहे.

Updated: Feb 19, 2016, 12:21 PM IST
मोदींना व्हायचं नाही 'डॉक्टर' title=

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठाकडून त्यांच्या सन्मानार्थ दिली जाणारी डॉक्टरेट ही पदवी नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. अशी पदवी घेणे आपल्याला पटत नसल्याचं कारण देऊन त्यांनी ती घ्यायला नकार दिला आहे.

२० फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी त्यांना विद्यापीठाकडून 'डॉक्टरेट ऑफ लॉ' ही पदवी दिली जाणार होती. विद्यापीठाने काढलेल्या एका परिपत्रकानुसार त्यांना 'त्यांच्या नवनवे उपक्रम हाती घेणे, सुधारणा घडवून आणणे आणि एक उत्कृष्ट नेता या गुणांसाठी ही पदवी बहाल करण्यात येणार होती.'

ही पदवी बहाल करण्यापूर्वी विद्यापीठाने मोदींकडे परवानगी मागितली होती. पण, नरेंद्र मोदी यांनी मात्र ही पदवी स्विकारण्यास नकार दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

याआधीही मोदी यांनी अशाच मानद डॉक्टरेट स्विकारण्यास नकार दिला होता. २०१४ साली त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान लुसियाना विद्यापीठाकडूनही त्यांनी अशाच प्रकारची पदवी स्वीकारली नव्हती. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी अशा पदव्या नाकारल्या होत्या. आताचा हा निर्णय त्यांच्या धोरणाला अनुसरुनच घेतल्याचे म्हटले जात आहे.