www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय भविष्य निर्वाह निधी सदस्यांना त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) खात्यामध्ये जमा असलेली रक्कम आता ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यामुळे पीएफ आता एका क्लिकवर दिसू शकेल. आपला हवा असलेला तपशील डाऊनलोडही करून ठेवता येईल.
पीएफबाबत डिसेंबरमध्ये घोषणा करण्यात आली होती. ई-पासबुक सेवा २१ जूनपासून कार्यान्वित झाली आहे. यामुळे सदस्यांना त्यांच्या खात्यात जमा होणार्याड रकमेचा हिशोब तपासणे सहज शक्य होणार आहे. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी विभागाचे आयुक्त आर.सी.शर्मा यांच्या हस्ते या सेवेची सुरुवात झाली. विशेष म्हणजे, सध्या ज्या सदस्यांचे नोकरी सुरु आहे आणि महिन्याकाठी ज्यांचा प्रॉव्हिंडट फंड जमा होत आहे, त्यांना तर ही सुविधा मिळेलच, पण जे सध्या सेवेत नाहीत मात्र, ज्यांनी अद्यापही त्यांच्या खात्यातून पैसे काढलेले नाहीत अशाही सदस्यांना ई-पासबुक सेवेचा लाभ मिळणार आहे.
जे सदस्य सेवेत नाहीत आणि ३६ महिने अर्थात तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला असेल अशा सदस्यांना या सेवेचा लाभ मिळणार नाही. त्यांचे खाते `डॉर्मंट` अर्थात `निद्रीत` समजले जाईल. सदस्यांना विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ओळखपत्राच्या आधारे सदस्य नोंदणी करावी लागेल. यामध्ये पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक आदीपैकी एक क्रमांक द्यावा लागेल.
तसेच तुमचा मोबाईल क्रमांकही देणे गरजेचे आहे. फक्त, एका लॉग इनसाठी एकच मोबाईल नंबर कार्यरत राहील. समजा एखाद्या सदस्याने दोन-तीन किंवा जास्त ठिकाणी नोकर्याज केल्या असतील आणि तेथील पीएफ खात्याची जोडणी केली नसेल किंवा त्यातून पैसेही काढले नसतील तर त्याची सर्व खाती त्याला एकाच `लॉग इन` मध्ये जोडून घेता येतील. याकरिता, नोकरी केलेल्या संस्थेने सुरू केलेल्या पीएफ खात्याचा तपशील त्याला द्यावा लागेल. या सेवेचा लाभ पाच कोटींपेक्षा जास्त सदस्यांना घेता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.