पंतप्रधानांचा फोटोचा जाहिरातीसाठी वापर; जिओ, पेटीएमला नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो खाजगी कंपन्यांनी आपल्या जाहिरातीवर वापरल्यानं पेटीएम आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांना नोटीस धाडण्यात आलीय. 

Updated: Feb 4, 2017, 05:35 PM IST
पंतप्रधानांचा फोटोचा जाहिरातीसाठी वापर; जिओ, पेटीएमला नोटीस  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो खाजगी कंपन्यांनी आपल्या जाहिरातीवर वापरल्यानं पेटीएम आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांना नोटीस धाडण्यात आलीय. 

इकोनॉमिक टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक प्रकरणातील अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून या कंपन्यांना, पंतप्रधानांचा फोटो वापरण्याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलंय. पंतप्रधानांचा फोटो जाहिरातीसाठी वापरण्यापूर्वी यासाठी योग्य ती परवानगी घेण्यात आली होती का? याबद्दल खुलासा करण्यास सांगितलं गेलंय. 

तसंच राज्य चिन्ह आणि नाव कायदा 1950 नुसार, ज्या नावांवर आणि चिन्हांच्या व्यावसायिक वापरावर बंदी घालण्यात आलीय त्यांचा वापर करण्यासाठी अगोदरच परवानगी घेणं आवश्यक असतं.

पेटीएमनं नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिलेल्या जाहिरातीत पंतप्रधानांचा फोटो वापरत नोटाबंदीचं समर्थन केलं होतं. तर मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जिओनं डिजीटल इंडियाचं समर्थन करत मोदींच्या फोटोचा वापर आपल्या जाहिरातीत केला होता. यानंतर दोन्ही कंपनींवर टीका झाली होती.