लंडन: मी जबरदस्ती भारतातून बाहेर गेलो आहे, भारतात परत यायची सध्या कोणतीही योजना नाही, अशी प्रतिक्रिया बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये गेलेल्या उद्योगपती विजय माल्ल्यानं दिली आहे.
माल्ल्याचा पासपोर्टही केंद्र सरकारनं रद्द केला आहे. मला बँकांचं कर्ज फेडायचं आहे, पण माझा पासपोर्ट रद्द करून आणि मला अटक करून त्यांना पैसे मिळणार नाहीत, असंही माल्ल्या म्हणाला आहे.
मी निश्चितच भारतात परत येईन, पण आत्ताची परिस्थिती माझ्याविरोधात आहे. आता माझा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे, यानंतर सरकार काय करेल हे मला माहित नाही, असं वक्तव्य माल्ल्यानं केलं आहे.
मी एक देशभक्त आहे, भारताचा तिरंगा फडकवताना मला गर्व होतो, पण माझ्याबद्दल आता जो आरडाओरडा सुरु आहे, तो पाहता मी ब्रिटनमध्येच सुरक्षित आणि खुष असल्याचं माल्ल्याचं म्हणणं आहे.