कमल हसनशी माझं वैयक्तिक वैर नाही - जयललिता

‘विश्वरुपम’वरून निर्माण झालेल्या वादामुळे तामिळनाडूतील राजकीय वातावरणही चांगलच तापलंय. सुरक्षितेच्या कारणास्तव कमल हसनच्या `विश्वरूपम` या चित्रपटावर बंदी घातली गेली असून त्यामागे माझा कोणताही वैयक्तिक हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दिलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 31, 2013, 02:32 PM IST

www.24taas.com, चेन्नई
‘विश्वरुपम’वरून निर्माण झालेल्या वादामुळे तामिळनाडूतील राजकीय वातावरणही चांगलच तापलंय. सुरक्षितेच्या कारणास्तव कमल हसनच्या `विश्वरूपम` या चित्रपटावर बंदी घातली गेली असून त्यामागे माझा कोणताही वैयक्तिक हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दिलंय.
या चित्रपटावर राजकीय हेव्यादाव्यातून बंदी घालण्यात आल्याचा आरोप बुधवारी अभिनेता कमल हसन यानं केला होता. हा आरोप चुकीचा असल्याचं सांगत जयललितांनी सरकारची भूमिका मांडलीय. ‘विश्वरुपम’ या चित्रपटाला तब्बल २४ मुस्लिम संघटनांनी विरोध दर्शवला होता त्यामुळे सिनेमावरून हिंसक आंदोलनाची होती शक्यता होती आणि कायदा-सुव्यवस्था राखणं ही सरकारची जबाबदारी असल्यानं या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला, असं जयललिता यांनी म्हटलंय. ९२२६ पोलिसांच्या आधारे राज्यातील ५२४ चित्रपटगृहांना सुरक्षा पुरविणं केवळ अशक्य असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
‘विश्वरुपम’ सिनेमावरून माझ्यावर लावले गेलेले टीव्ही राईटसचे आरोप साफ चुकीचे आहेत. टीव्ही राईटस् आणि माझा काहीही संबंध नाही. असे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगत जयललितांनी थेट करुणानिधींवर हल्ला चढवलाय. करुणानिधींवर मानहानीचा खटला भरणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

अभिनेता कमल हसन यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना जयललिता म्हणतात, ‘कमल हसनसोबत माझे कुठलेही वैयक्तिक मतभेद नाहीत. कमल हसन हा काही देशाचा पंतप्रधान ठरवत नाही... त्यांनी विरोध करणाऱ्या संघटनांशी चर्चा करून संबंधित चित्रपटातून वादग्रस्त सिन्स हटविले गेले तर चित्रपटाला मंजूरी देऊ’ असंही त्यांनी म्हटलंय.