www.24taas.com, नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीनं सोमवारी एक नवी ‘वॅगन–आर’ ग्राहकांसमोर सादर केलीय. या नव्या वॅगन–आरची दिल्लीतील शोरुममध्ये सध्याची किंमत आहे ३ लाख ५८ हजार रुपये...
कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार, नवी वॅगन-आर जुन्या मॉडेलपेक्षा जवळजवळ १० हजार रुपयांनी महाग आहे पण या कारचा मायलेजही पूर्वीच्या मॉडेलपेक्षा ८ टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवी वॅगन–आर प्रति लिटर २०.५१ किलोमीटरचं मायलेज देऊ शकते.
मारुती सुझुकीचे भारताचे उपाध्यक्ष मनोहर भट्ट यांच्या म्हणण्यानुसार, वॅगन – आर ही मारुतीच्या ताफ्यातील सर्वाधिक खपाची गाडी आहे इतकंच नव्हे तर कंपनीच्या प्रथम पाच मॉडलपैकी एक मॉडेल ठरलंय. आम्ही ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारावर वॅगन – आरमध्ये बदल करून ती नव्या स्वरुपात सादर केलीय, असं भट्ट् यांनी म्हटलंय.
‘वॅगन–आर’ची किंमत ३ लाख ५८ हजार रुपये आहे... तर मिडलेव्हल मॉडेलची किंमत ३ लाख ८८ हजार रुपये तर टॉप एन्ड मॉडेल ४ लाख १३ हजार रुपये आहे. हीच कार सीएनजी कीटसहीत ४ लाख ४२ हजारांमध्ये उपलब्ध होईल.