www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने फिल्डींग लावली आहे. त्यासाठी २१ जणांची नवी टीम जाहीर करण्यात आलीय. मुंबईतले खासदार गुरुदास कामत यांच्यावर सरचिटीणीसपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
जयपूरमध्ये राहुल गांधींची उपाध्यक्षपदी निवड झाल्यावर काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवी टीम जाहीर केली आहे. २१ सदस्यांच्या कार्यकारिणीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातून राजीनामा देणारे सीपी जोशी आणि अजय माकन यांनाही सरचिटणीस बनवण्यात आलं आहे. काँग्रेस नेता जनार्दन द्विवेदी यांनी याची घोषणा केली.
रविवारी माजी केंद्रीय मंत्री अजय माकन आणि सी. पी. जोशी यांना अंबिका सोनी, गुरुदास कामत यांच्याबरोबरीने सरचिटणीसपदाची सूत्रे सोपविण्यात आली. नव्या दमाच्या व्यक्तींना पक्षांतर्गत जबाबदारी सोपविताना काँग्रेसने मावळते सरचिटणीस गुलाम नबी आझाद आणि ऑस्कर फर्नांडिस यांना बाजूला सारले आहे.
सोनिया गांधी यांनी आपले राजकीय सल्लागार म्हणून पुन्हा अहमद पटेल यांच्यावर विश्वास दाखविला आहे. विशेष मर्जीतील अंबिका सोनी यांच्यावर पक्षाध्यक्षांच्या कार्यालयाची अतिरिक्त जबाबदारी टाकण्यात आली आहे. तर राहुल गांधींचे निकटवर्तीय, गुजरातमधील मधूसुदन मिस्री यांच्याकडे केंद्रातील सत्तेचे तिकीट असणाऱ्या उत्तर प्रदेशची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. त्यांच्याबरोबर दिग्विजय सिंहही असतील; तसेच या दोघांकडे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गोवा राज्यांचीही जबाबदारी देण्यात आली आहे.
सरचिटणीसपदी नियुक्त केलेल्यांमध्ये मोहन प्रकाश, शकील अहमद आणि लुईझिनो फालेरो यांचाही समावेश आहे. या तिघांकडे यापूर्वी काही राज्यांची जबाबदारी होती. ते काँग्रेस महासमितीचे निमंत्रक म्हणूनही कार्यरत होते. वगळलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये सरचिटणीस विलास मुत्तेमवार, बीरेंद्र सिंह, जगमीतसिंग ब्रार, जगदीश टायटलर, आणि गुलचैन सिंग चरक यांचा समावेश आहे.
अजय माकन यांच्यावर पक्षात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जनसंपर्क, माध्यमे आणि प्रचार-प्रसार विभागाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. या पूर्वी माध्यमांची जबाबदारी जनार्दन द्विवेदी यांच्याकडे होती. खासदार प्रिया दत्त माकन यांच्या सहकाऱ्याच्या भूमिकेत असणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.