फैजाबाद : फैजाबादमध्ये राहणारे गुमनामी बाबा ऊर्फ भगवानजी हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते, याला दुजोरा मिळत चाललाय.
मिळालेल्या माहितीनुसार, गुमनामी बाबा यांच्या शेवटच्या पेटीमध्ये नेताजींच्या कुटुंबाचा फोटो सापडलाय. हायकोर्टाच्या आदेशनांतर गेल्या दोन आठवड्यांपासून गुमनामी बाबांचं सामान उघडलं जात आहे. मंगळवारी त्यांची शेवटची पेटी उघडण्यात आली.
या २६ व्या पेटीत नेताजींचा आपल्या कुटुंबीयांसोबत काढलेला एक 'फॅमिली फोटो' सापडलाय. या फोटोमध्ये नेताजींचे माता - पिता जानकीनाथ बोस आणि प्रभावती बोस आणि कुटुंबातील इतर लोक दिसत आहे.
तसंच गुमनामी बाबांच्या सामानात विदेशी घड्याळं जिल्हा ट्रेजरीमधून मिळालीयत. ओमेगा आणि रोलेक्सची ही घड्याळं आहेत. तसंच एक पॉकेट वॉचही सापडलंय. गुमनामी बाबा म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते, असं म्हटलं जातंय.
गुमनामी बाबांच्या सामानात काही पत्रंही मिळालीत. ही पत्रं आझाद हिंद फौजेच्या कमांडर आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांना लिहिलीत. यामध्ये आझाद हिंद सेनेचे कमांडर सांगितल्या जाणाऱ्या पवित्र मोहर राय यांच्या पत्राचाही समावेश आहे. या पत्रात त्यांनी गुमनामी बाबांचा स्वामी, भगवान या नावांनी उल्लेख केलाय.
उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी या गुमनामी बांबांचं वास्तव्य होतं. १९८२ ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९८५ पर्यंत ते फैजाबादमध्ये राहिले. फैजाबादमध्ये सरयू नदीच्या किनाऱ्यावर गुप्तार घाटात गुमनामी बाबांची समाधी आहे. १८ सप्टेंबर १९८५ रोजी गुमनामी बाबांच्या निधनानंतर इथंच त्यांचा अंत्यसंस्कार झाला होता. गुमनामी बाबा म्हणजेच सुभाषचंद्र बोस होते का? याच्या तपासासाठी त्यांच्याकडच्या काही वस्तू जस्टिस मुखर्जी चौकशी आयोगानं घेतल्या होत्या.
आतापर्यंत जस्टिस मुखर्जी चौकशी आयोगाकडे असलेल्या ११४७ वस्तूंपैकी ९४२ वस्तू परत मिळाल्यायत. गुमनामी बाबांच्या या वस्तूंमध्ये जर्मंन बनावटीच्या सुया, पत्रं, मनीऑर्डर्सच्या रिसीट, सिगार पाईप्सही मिळालेत.