www.24taas.com,नवी दिल्ली
दिल्लीतल्या बलात्कार पीडित तरुणीवर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहराज्यमंत्री आर पी एन सिंह उपस्थित होते. पीटीआयनं हे वृत्त दिलंय.
पहाटे साडेतीन वाजता तरुणीचा मृतदेह सिंगापूरहून भारतात आणण्यात आला. एअर इंडियाचं खास विमान तरुणीचा मृतदेह घेऊन पहाटे साडेतीन वाजता दिल्लीत दाखल झालं. तिच्यावर सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी रात्री सव्वादोन वाजता तिचं निधन झालं.
पीडित तरुणी तब्बल १३ दिवस आधी दिल्लीतल्या आणि नंतर सिंगापूरमधल्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. दिल्लीत तिच्यावर चालत्या बसमध्ये बलात्कार झाला होता. दिल्ली गँगरेपप्रकरणानंतर या घटनेविरोधात लोक रस्त्यावर उतरलेयत. तर दिल्लीत या घटनेचा निषेध करत दिल्लीकरांनी कँडल मार्च काढला.
या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येनं तरुण तरुणी सामील झाले होते. पिडित तरुणीच्या मृत्यूची बातमी कळताच दिल्लीतलं वातावरण सुन्न झालं होतं. त्यानंतर या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी दिल्लीकर रस्त्यावर उतरलेयत. बलात्कार करणा-या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी भावना देशवासीयांनी व्यक्त केलीये. पीडित मुलीच्या मृत्युनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. देशभरात निदर्शनं करण्यात आली. दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येतेय.
दरम्यान आजही राजधानी दिल्लीत करड सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय. तसंच दिल्लीची दहा मेट्रो स्टेशन्स आजही बंद करण्यात आलीत. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. दिल्ली सरकारनंही जनतेला शांततेचं आवाहन केलंय